अखेरच्या सरींनी कपाशीला जीवदान
---------------
पावसाच्या खंडाने सोयाबीनचे मात्र नुकसान; रब्बीसाठी हवा दमदार पाऊस
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. २० ः यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दिलेल्या मोठ्या खंडाचा फटका सोयाबीनला मोठ्या प्रमाणात बसला. पावसाअभावी जिल्ह्यात सोयाबीनची वाढ खुंटली असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तर सोयाबीनचे पीक हातचे गेले. मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून विशेषतः नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशीला या पावसाने मोठा आधार मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
खरीप हंगामाच्या सुरवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पेरणी केली होती. सोयाबीन, कापूस यासह विविध पिकांची पेरणी वेळेत झाली. सुरवातीला पिकांची उगवणही चांगली झाली. मात्र, त्यानंतर पावसाने मोठा खंड घेतल्याने परिस्थिती झपाट्याने बदलली. पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाला आणि सोयाबीनच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाला. सोयाबीन हे कमी कालावधीत येणारे महत्त्वाचे खरीप पीक असल्याने त्याच्या वाढीच्या आणि शेंगा भरण्याच्या काळात पुरेसा पाऊस आवश्यक असतो. ऐन महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाने दडी मारल्याने सोयाबीनची वाढ खुंटली. काही ठिकाणी झाडांची पाने पिवळी पडली असून, शेंगांची संख्या आणि दाण्यांचा आकार कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी यंदाच्या हंगामात सोयाबीन उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला. पावसाअभावी कपाशीच्या पिकालाही ताण बसला होता. अनेक ठिकाणी कपाशीची वाढ खुंटली. जमिनीत ओलावा नसल्याने झाडांची पाने कोमेजण्यास सुरवात झाली होती. अशा परिस्थितीत झालेल्या पावसाने जमिनीतील ओलावा वाढला असून कपाशीला संजीवनी मिळाली आहे. कापूस हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे नगदी पीक असल्याने या पावसाकडे शेतकरी मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. सध्या मिळालेला ओलावा पुढील काही दिवस टिकून राहिल्यास पिकाच्या वाढीस त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनचे नुकसान झाले असले तरी कपाशीच्या काही प्रमाणात उत्पादनाची आशा कायम ठेवत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
---
खर्च वसूल करण्याची चिंता
खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी, मशागतीवर मोठा खर्च झालेला आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन न झाल्यास हा खर्चही भरून निघणे कठीण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत कपाशीतून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. आगामी काळात पावसाने साथ दिल्यास उत्पादन समाधानकारक होऊ शकते, अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत. मात्र, पुढील काळातील पावसाचे सातत्य, पिकांची सद्यःस्थिती आणि बाजारातील दर यावर शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून राहणार आहे.
---
सध्या दिलासा, संकट कायम
दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काही प्रमाणात समाधान दिसत असले तरी सोयाबीनचे झालेले नुकसान भरून निघणे अवघड आहे. त्यामुळे एकीकडे हातचे गेलेल्या सोयाबीनची चिंता, तर दुसरीकडे कपाशीला मिळालेल्या जीवदानाचे समाधान अशा दुहेरी मनःस्थितीत शेतकरी आहेत. आता पुढील काही दिवस पाऊस कसा राहतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. कपाशीला आवश्यक त्या टप्प्यावर पाऊस मिळाल्यास यंदाच्या खरीप हंगामातील नुकसान काही प्रमाणात भरून काढण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. दरम्यान परतीच्या पावसावरच आता जलसाठ्यांचे भवितव्य अवलंबून असून पावसाळ्यात दमदार पावसाअभावी जलसाठे कोरडे पडले आहेत.
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.