उसाला पहिली उचल ४२५० रुपये द्या
ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
परभणी, ता. १३ : यंदाच्या गाळप हंगामात उसाला जाहीर करण्यात आलेली पहिली उचल उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यल्प असून, प्रतिटन ४२५० रुपये पहिली उचल द्यावी, तसेच साखरेचा प्रतिक्विंटल ४५०० रुपये अंतिम दर जाहीर करावा, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, जिल्हा परभणीच्या वतीने करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाभरात मोर्चा, रास्ता रोको आंदोलन तसेच साखर कारखान्यांच्या गेटवर बसून साखर विक्री बंद पाडण्याचा इशारा समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
चालू गाळप हंगामात परभणी जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनी उसाला प्रतिटन ३००० ते ३१५० रुपये पहिली उचल जाहीर केली आहे. पण बियाणे, खत, मजुरी, पाणी आणि वीज यांसह उसाच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्या तुलनेत जाहीर करण्यात आलेला दर अत्यल्प असून, शासनाने जाहीर केलेल्या एफआरपीमध्येही उत्पादन खर्चाचा योग्य विचार झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरही दराच्या बाबतीत अन्याय होत असल्याचा आरोप समितीने केला आहे. मराठवाड्यासाठी रिकव्हरीचा दर ९.५० टक्के निश्चित करण्यात आला असून, उर्वरित महाराष्ट्रात १०.२५ टक्के गृहीत धरण्यात आला आहे. या तफावतीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना प्रतिटन सुमारे ३०० रुपयांचे नुकसान होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शासन दरवर्षी एफआरपीमध्ये वाढ करते. पण किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) कोणत्याही प्रकारची वाढ केली जात नाही. परिणामी, साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सध्याच्या परिस्थितीत एमएसपी आणि प्रत्यक्ष साखर विक्रीच्या भावात प्रतिक्विंटल सुमारे दोन हजार रुपयांची तफावत आहे. दुष्काळी परिस्थिती आणि अलनिनोच्या संभाव्य प्रभावामुळे उसाचे उत्पादन घटण्याची शक्यता असून, भविष्यात साखरेच्या भावात वाढ होण्याची शक्यता असल्याचेही समितीने म्हटले आहे. परभणी जिल्ह्यातील कारखानदारांनी ३००० ते ३१०० रुपये पहिली उचल जाहीर केली असली, तरी अंतिम भाव किती देणार, याबाबत स्पष्टता दिलेली नाही. त्यामुळे उसाला प्रतिटन ४२५० रुपये पहिली उचल आणि साखरेचा प्रतिक्विंटल ४५०० रुपये अंतिम दर जाहीर करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनाच्या प्रती साखर आयुक्त, साखर संचालक (महाराष्ट्र राज्य, पुणे), साखर सहसंचालक, नांदेड तसेच पाथरी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.