ग्रामसभा की राजकीय संघर्षाचे व्यासपीठ?
आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले; विकासकामांऐवजी गटबाजीवर चर्चा
जळकोट, ता. १६ (बातमीदार) : गावाच्या विकासासाठी असलेली ग्रामसभा अनेक गावांत विकासकामांवरील चर्चा आणि निर्णयांचे व्यासपीठ राहण्याऐवजी राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे केंद्र बनत असल्याचे चित्र आहे. ग्रामसभांमध्ये वाढलेले वाद, गोंधळ आणि सत्ताधारी गटाविरोधातील नाराजीमुळे गावातील राजकीय वातावरण तापत आहे. विशेषतः तरुणाई आणि विद्यमान सत्ताधाऱ्यांमधील मतभेदांमुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबल्याने विद्यमान सत्ताधाऱ्यांविरोधातील नाराजी ग्रामसभांमधून व्यक्त होत असल्याचे दिसून येते. गावोगावी नव्या नेतृत्वाबाबत चर्चा सुरू असून, विकासकामांचा दर्जा, निधीचा वापर, ग्रामपंचायतीचा कारभार, निर्णयप्रक्रिया आणि मूलभूत सुविधांवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी अनेकदा त्याचे रूपांतर आरोप-प्रत्यारोपांत होत असल्याने ग्रामसभेच्या मूळ उद्देशावर परिणाम होत असल्याची नागरिकांची भावना आहे.
दरम्यान, प्रशासकीय पातळीवरील अडचणींमुळेही विकासकामे रखडत असल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामसेवकांकडे गावांची जबाबदारी असली तरी विकासकामांसाठी आवश्यक खर्चाच्या मंजुरीबाबत स्पष्ट अधिकार नसल्याने काही कामांना विलंब होत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ग्रामसभांमध्ये राजकीय संघर्ष आणि दुसरीकडे विकासकामांचा रखडलेला कारभार, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
ग्रामसभेचा उपयोग गावातील विकासकामांचे नियोजन, प्रश्नांची चर्चा आणि निर्णय घेण्यासाठी व्हावा, यासाठी शासनाने ग्रामपंचायत निवडणुकांबाबत स्पष्ट निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. निवडणुका तातडीने घेणे शक्य नसल्यास प्रशासकीय यंत्रणेला विकासकामे आणि आवश्यक खर्चाबाबत स्पष्ट अधिकार द्यावेत, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.