परभणी : लॉकडाउनचा फटका प्रत्येक घटकाला, योजनेला बसला आहे. स्वप्नातील घर व्हावे म्हणून केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेला देखील लॉकडाउनचा मोठा फटका बसला आहे. दोन महिने बांधकामे बंद असल्याने योजनेतील कामेदेखील ठप्प झाल्याने घरकुलांच्या कामावर परिणाम झाला आहे. सध्या कामे सुरू असली तरी वाळूचा मोठा प्रश्न लाभार्थींसमोर असून वाळू मिळणे अवघड झाले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०२२ पर्यंत सर्वांना घर देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना घर मिळावे यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याचा मानस जाहीर केला आहे. याची अंमलबजावणी शासन ठामपणे करेल आणि या दृष्टीने निर्णय घेण्यात आले आहेत. केंद्र शासनातर्फे ता. १७ जून २०१५ रोजी सर्वांसाठी घर (नागरी) योजना- प्रधानमंत्री आवास योजना मंजूर करण्यात आली. ही योजना ता. २५ जून २०१५ रोजी सुरू करण्यात आली.
हेही वाचा व पहा : Video : कोरोनाचे विघ्न बाप्पाच्या मूर्तिकारांवर
बहुतांष कामे पूर्ण
२०१६-१७ मध्ये परभणी जिल्ह्याला दोन हजार ६७, २०१७-१८ मध्ये एक हजार ९६, २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी २०८ एवढेच उद्दिष्ट होते. यातील बहुतांष कामे पूर्ण झाली आहेत. २०१९-२० या आर्थिक वर्षात परभणी जिल्ह्याला एक हजार सहा घरकुलांचे उद्दिष्ठ मिळाले आहे. त्यातील ९०५ लाभार्थींच्या घरकुलाची कामे करण्यास मंजुरी मिळाली आहे. ही कामे सुरू असताना ता. २४ मार्चपासून लॉकडाउन झाल्याने दोन महिन्यांहून अधिक दिवस कामे थांबली होती. लॉकडाउन उठल्यानंतर केवळ २८ घरकुलांची कामे होऊ शकली आहेत.
२८ घरकुलांची कामे पूर्ण
लॉकडाउनच्या पूर्वी ता. २० मार्चअखेरपर्यंत १७१ घरकुलांची कामे पूर्ण झाली होती. त्यानंतर मे महिन्यात लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यानंतर बांधकामे करण्यास सूट मिळाली. त्यामुळे ता. दहा जूनपर्यंत २८ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यातील ७१६ लाभार्थींना पहिला हप्ता वितरीत करण्यात आला आहे, तर ३५९ लाभार्थींनी दुसरा हप्ता देण्यात आला आहे.
अशी आहे पात्रता
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार झोपडपट्टीवासीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्ती, अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती, या योजनेसाठी पात्र ठरविण्यात येणार आहेत. लाभार्थींच्या कुटुंबाच्या व्याख्येत पती, पत्नी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावे भारतात कोठेही पक्के घर नसावे. अशा पात्र व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळतो.
हेही वाचा व पहा : Video : परभणीच्या चित्रपटगृहांचे बुडाले एक कोटींचे उत्पन्न !
वाळूचे संकट
जिल्ह्यात वाळू घाटाचे लिलाव झाले नसल्याने वाळूचे भाव गगणाला भिडले आहेत. लिलाव नसतानाही अवैध मार्गाने दरररोज नद्यांची चाळणी होत आहे. लॉकडाउन पूर्वी आणि आताही गोदावरी, पूर्णा, दुधना या नदी पात्रातून वाळूचा उपसा केला जात आहे. चोरट्या मार्गाने हा व्यवसाय सुरू असल्याने वाळू माफियांनी वाळूचे दर वाढविले आहेत. त्याचा फटका घरकुल कामांना बसत आहे. चढ्या दराने वाळू विकत घेणे शक्य नसल्याने शासनाने जप्त केलेल्या साठ्यातून घरकुलांच्या कामांना वाळू देण्याची मागणी होत आहे.
तालुका उद्दिष्ट पूर्ण संख्या
गंगाखेड १८५ २७
जिंतूर २०० ३२
मानवत ४७ सहा
पालम १२१ १५
परभणी १३४ ५७
पाथरी ५४ दोन
पूर्णा ७२ २२
सेलू ९७ १२
सोनपेठ ९६ १६
एकूण १००६ १९८
....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.