मराठवाडा

शिवालयांत दर्शनासाठी जनसागर! 

सकाळवृत्तसेवा

वेरूळ, परळी, औंढा - बारा ज्योतिर्लिंगांपैकी मराठवाड्यात असलेल्या वेरूळ, परळी, औंढा नागनाथ येथील शिवालयांत महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी (ता. 14) दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. "हर हर महादेव'चा जयघोष करीत दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले. 

वेरूळला लाखो भाविक 
वेरूळ ः देशभरात प्रसिद्ध असलेल्या येथील बाराव्या ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी देशभरातील भाविकांनी गर्दी केली. जिल्ह्यातील भाविकांनी पहाटेपासूनच "हर हर महादेव'चा गरजर करीत दर्शन घेतले. भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर दिवसभर फुलून गेला होता. 

श्री घृष्णेश्वर महादेवाच्या पालखीची दुपारी तीनच्या सुमारास वाजत-गाजत पालखी मिरवणूक काढण्यात आली. जवळच असलेल्या शिवालय तीर्थकुंडावर पालखी नेऊन तेथे विधिवत पूजा, पंचामृत अभिषेक झाला. हा सोहळा पाहण्यासाठीही मोठी गर्दी होती. दरम्यान, स्वयंसेवी संस्थांच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याचे पाणी, उपवासाची खिचडी, केळी, पेंडखजूर आदींचे वाटप करण्यात आले. त्यामुळे तासन्‌तास रांगेत उभ्या असलेल्या भाविकांची सोय झाली. भाविकांत महिलांची संख्या मोठी होती. 

जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांच्या आदेशान्वये यंदा प्रथमच एकखिडकी सेवा कार्यपद्धती राबविण्यात आली. विविध सुविधांसह आपत्कालीन परिस्थितीत संबंधित यंत्रणांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले. मंदिर ट्रस्टतर्फे भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. 

परळीमध्ये गर्दीत मोठी वाढ 
परळी वैजनाथ ः "हर हर महादेव', "वैद्यनाथ महाराज की जय'चा जयघोष करीत पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे सुमारे चार लाखांवर भाविकांनी दर्शन घेतले. महशिवरात्रीनिमित्त यात्रा महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरवात झाली. काही वर्षांच्या तुलनेत यंदा भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली. दर्शनासाठी शिवभक्‍तांचा महासागर उसळला. भाविकांच्या दूरपर्यंत रांगा होत्या. 

गुरुवारी (ता. 23) मध्यरात्री बाराच्या सुमारास वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची महापूजा, काकड आरती झाली. त्यानंतर भाविकांनी दर्शनास सुरवात केली. काल रात्री दहापासूनच मंदिर पायरीवर भाविक दर्शनासाठी थांबले होते. आज सकाळनंतर मंदिरासमोरील पायऱ्याही गर्दीने गजबजून गेल्या. कडक उन्हातही दिवसभर जनसागर कायम होता. सायंकाळी सहापर्यंत सुमारे चार लाखांवर भाविकांनी "श्री'चे दर्शन घेतले. सायंकाळी सातच्या सुमारास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते शासकीय महारुद्राभिषेक पूजा झाली. देवस्थान संस्थानतर्फे पिण्याचे पाणी, उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून दर्शन मार्गावर कापडी मंडप टाकण्यात आले होते. दर्शन पासची व्यवस्था होती. मोठ्या गर्दीमुळे अनेक भाविकांनी मंदिर पायरीचे दर्शन घेतले. 

दिवसभर चौघडा वादन 
मंदिरावर रोषणाईही करण्यात आली आहे. महाशिवरात्रीनिमित्त वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची पिंडी रत्नजडित अलंकारांनी सजविण्यात आली होती. मुख्य प्रवेशद्वारासमोर पुणे येथील अनिल जगन्नाथ नगरकर यांचे दिवसभर सनई, चौघड्याचे वादन अखंडपणे सुरू होते. त्यामुळे मंदिरातील वातावरण संगीतमय होऊन गेले. 

औंढ्यात विविध कार्यक्रम 
औंढा नागनाथ ः येथील ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरामध्ये हजारो भाविकांनी गर्दी केली. देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार श्‍याम मदनूरकर, विश्वस्त सल्लागार शिवाजी देशपांडे, विश्वस्त रमेशचंद्र बगडिया, विद्या पवार, आनंद निलावार, डॉ. प्रज्ञा सातव यांच्या हस्ते मध्यरात्री अभिषेक करण्यात आला. या वेळी श्रीपाद भोपी, पद्माक्ष पाठक, संजय पाठक, श्रीपाद दीक्षित आदींची उपस्थिती होती. नागनाथ दर्शनाचा पहिला मान मिळाल्याबद्दल पानकनेरगाव येथील अविनाश रमेशआप्पा अकमार यांचा देवस्थानतर्फे सत्कार झाला. देवस्थानतर्फे भाविकांसाठी फराळ, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 7 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT