हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा परिसरातून महसूल विभाग व पोलिस विभागाच्या पथकाने शुक्रवारी (ता.१९) सायंकाळी पाच हजार लिटर केरोसीनचे एक टँकर व ३७ टाक्या केरोसीन असा एकूण बारा हजार चारशे लिटर केरोसीन जप्त केले आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथून एक केरोसीनचे टँकर आखाडा बाळापूर (ता.कळमनुरी) येथे पाठवण्यात आले होते. मात्र हे टँकर आखाडा बाळापूर येथे पोहोचण्याऐवजी थेट वारंगा फाटा (ता. कळमनुरी) येथे पोहोचले. त्या ठिकाणी एका गोदामावर टँकरमधून केरोसीन टाक्यांमध्ये भरले जावू लागले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, आखाडा बाळापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने सायंकाळी वारंगा फाटा येथे जावून पाहणी केली. यावेळी टँकरमधील केरोसीन चुकीच्या ठिकाणी उतरवले जात असल्याचे आढळून आले.
उपविभागीय अधिकारी श्री. खेडेकर व सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. चिंचोलकर यांनी तपासणी केली असता टँकरमधील सात हजार चारशे लिटर केरोसीन ३७ टाक्यांमध्ये काढून घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले. टँकरमध्ये पाच हजार लिटर रॉकेल असल्याचे आढळून आले. या पथकाने संबंधित गोदामाला सिल ठोकले असून पाच हजार लिटर केरोसीन असलेले टँकर सायंकाळी उशिरा आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे.
या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत चौकशीचे काम सुरु होते. या ठिकाणी टँकर व एका गोदामात टाक्या पकडल्यानंतर या पथकावर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र या पथकाने राजकीय दबाव झुगारून तपासणीचे काम सुरुच ठेवले होते.
तडीपार स्पेशालिस्ट अधिकाऱ्याची कारवाई
उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर हे तडीपार स्पेशालिस्ट अधिकारी म्हणून परिचित आहेत. जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी व राजकीय पदाधिकाऱ्यांवर तडीपारीची कारवाई त्यांनी केली आहे. त्यानंतर आता त्यांचा मोर्चा अवैध केरोसीन विक्रीकडे वळला असल्याचे बोलले जात आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.