marathwada flood
esakal
मराठवाड्यात झालेली अतिवृष्टी अनेक गावांसाठी संकट घेऊन आली. लोकांच्या घरांत पाणी शिरले, साठवलेले अन्नधान्य वाहून गेले आणि अनेक घरांच्या भिंती कोसळल्या. दिवाळी तोंडावर असतानाही, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरची चिंता अजूनही कायम होती.
अशा कठीण प्रसंगी, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ वकील संघाने या संकटात सापडलेल्या बांधवांना मदतीचा हात पुढे केला. अध्यक्ष अॅड. योगिता थोरात आणि सचिव अॅड. श्रीकृष्ण चौधरी यांच्या नेतृत्वाखालील वकील बांधवांनी एकत्र येऊन भरघोस निधी गोळा केला.
गोळा झालेल्या या निधीतून प्रत्येकी १८ किलो वजनाच्या किराणा किट्स तयार करण्यात आल्या. या किटमध्ये गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळी, तेल, साखर, मसाले, चहा पावडर यांसारख्या आवश्यक अन्नपदार्थांसोबतच टूथपेस्ट, कपडे आणि साबण अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता.
काल अॅड. निसर्गराज गर्जे, अॅड. चेतन चौधरी आणि अॅड. विष्णू कंदे यांनी शेरी खुर्द, डोंगरगण, खालाटवाडी आणि कापसी या गावांमध्ये जाऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांना या किट्सचे वाटप केले.
किट घेताना एका वृद्ध शेतकरी दांपत्याच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते. हात जोडून ते वृद्ध काका गहिवरले आणि म्हणाले, “वकील साहेब, तुमच्या या मदतीमुळेच यावर्षी आमच्या घरात दिवाळीचे लाडू बनतील! तुम्हीच आमची दिवाळी साजरी करणार!”
त्यांच्या या कृतज्ञतेच्या शब्दांनी वकील बांधवांच्या डोळ्यांतही पाणी आले.
पूरग्रस्त गावांमधील अनेक शेतकरी अजूनही चिखल साफ करण्यात आणि तुटलेली घरे सावरण्यात गुंतलेले आहेत. वकील संघाच्या या मदतीने त्यांच्यात नव्या आशेचा किरण दिसू लागला आहे. मराठवाड्याच्या या कठीण काळात वकील संघाने दाखवलेला मायेचा ओलावा पूरग्रस्तांच्या मनाला खूप मोठा दिलासा देणारा ठरला आहे.