file photo
file photo 
मराठवाडा

प्रवाशांच्या मागण्यांना हवे अंमलबजावणीचे ‘बळ’

राजन मंगरुळकर

नांदेडः मराठवाड्यातील वाढती प्रवासी संख्या आणि त्या तुलनेत रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्या, कमी डब्बे, कमी आरक्षण कोटा आणि अजूनही महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी थेट रेल्वे नसल्याने प्रवाशांच्या मागण्या, प्रश्न प्रशासन दरबारी रखडलेले आहेत. या प्रश्नांना सोडविण्यासाठी दरवर्षी नांदेड येथे खासदारांची आढावा आणि मागणी बैठक गेल्या अनेक वर्षांपासून घेतली जाते.

बैठकीत निवेदनांचा पाऊस आणि मागण्यांची पूर्तता करण्याचे अाश्वसन देऊन साेपस्कार पूर्ण केले जातात. आजच्या बैठकीत तरी नवीन मार्ग, रखडलेले दुहेरीकरण विद्युतीकरण आणि नवीन रेल्वेची घोषणा करून प्रवाशांच्या मागणीला अंमलबजावणीचे बळ मिळणे गरजेचे आहे. यासाठी विभागातील खासदारांनी आपले प्रश्न एकजुटीने मांडल्यास मराठवाड्याचा रेल्वे बॅकलॉग भरून निघण्यास मदत हाेईल, असे मत रेल्वे संघटनेच्या सदस्यांनी, जाणकारांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केले आहे. 

  नांदेड येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा यांच्यासह ‘दमरे’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डीआरएम कार्यालय येथे बुधवारी (ता.13) मराठवाड्यातील आठ खासदारांसह वाशिम, यवतमाळ, तेलंगणातील काही खासदारांची ही बैठक घेण्यात येत आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागातील अनेक महत्त्वाचे रेल्वेमार्ग विस्तारीकरण आणि दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचे काम रखडले आहेत. सध्या मुदखेड-मुगट, नांदेड-लिंबगाव, परभणी-मिरखेल या ठिकाणी दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. नांदेड येथून उत्तर भारताला, दक्षिणेला जाणाऱ्या काही रेल्वे सुरू झाल्या असल्या तरी अद्याप महाराष्ट्रातील महत्त्वाची गावे थेट मराठवाड्याशी जाेडल्या गेलेली नाहीत. नांदेड- मनमाड, नांदेड-अकाेला, नांदेड-परळी या मार्गावर दिवसभरात 55 ते 60 रेल्वेंची ये-जा आहे. तरी विभागातील उस्मानाबाद, लातूर, बीड हे जिल्हे थेट रेल्वेने जाेडलेली नसतानाही आहे त्या पाच जिल्ह्यांतील प्रवाशांची दरराेजच्या रेल्वेमध्ये जागेची कमतरता, आरक्षणाची गैरसाेय, याेग्य वेळेला नसलेली रेल्वेची उपलब्धी यामुळे गैरसाेय हाेते.

या आहेत प्रमुख मागण्या 

मराठवाड्यासाठी नवीन स्वतंत्र झोन निर्माण करावा.

औरंगाबाद येथे रेल्वेची नवीन पिट लाईन टाकावी.

नांदेड ते औरंगाबाद नवीन डेमु लोकल सुरू करावी. 

नांदेड-औरंगाबाद स्पेशल रेल्वेला कायम करावे.

विभागातील परभणीसह नांदेड, आैरंगाबाद आदर्श रेल्वेस्थानकातील रखडलेली कामे पूर्ण करावीत. 

औरंगबाद-नागपूर, नांदेड-कोल्हापूर-गोवा एक्सप्रेस सुरू कराव्यात. 

तपोवन व मराठवाडा एक्सप्रेसला किमान 24 डबे लावावेत.

मुदखेड-आदिलाबाद, मनमाड-परभणी, परभणी-मुदखेडचे दुहेरीकरण त्वरित करावे.

मराठवाडा विभागातून थेट सोलापूरला जोडणारी रेल्वे उपलब्ध करावी. 

औरंगाबाद ते लातूर आणि औरंगाबाद ते उस्मानाबाद या मराठवाड्यातील शहरांना अजून पण रेल्वेने जोडलेली नाही.

नांदेड विभागात प्रवाश्यांना हव्या असलेल्या मुंबई, पुणे, सोलापूर, जळगावला जोडणाऱ्या नवीन रेल्वेची सुविधा दिली जात नाही. त्यामुळे नांदेड-मनमाड रेल्वे मार्ग कोणत्या विभागात आहे, असा प्रश निर्माण झाला आहे. विभागातील रेल्वे प्रश्नांच्या निवारणासाठी मराठवाड्यासाठी नवीन स्वतंत्र झोन निर्माण करण्यात यावा. 

- अरुण मेघराज, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ, परभणी.

मराठवाड्यातून मुंबई आणि पुणेसाठी नवीन रेल्वे सुरू करावी. औरंगाबाद येथे रेल्वेची नवीन पिट लाईन टाकावी, नांदेड ते औरंगाबाद नवीन डेमु लोकल सुरू करावी, नांदेड-औरंगाबाद स्पेशल गाडीला कायम करावे, या सोबतच परभणी आदर्श रेल्वेस्थानकातील रखडलेली कामे पूर्ण करावीत. 

- प्राचार्य सुरेश नाईकवाडे, उपाध्यक्ष, मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ, परभणी

-दक्षिण मध्य रेल्वेचा आजपर्यंतचा इतिहास हा जानूनबुजून प्रवासीहित, प्रवासी मागणी कधीही मान्य न करणे असाच आहे. मराठवाडा झोनच्या दाेन कोटी लोकांच्या मनातील महत्त्वपूर्ण रेल्वे चालू झाल्याशिवाय मराठवाड्यामधील आठही लोकसभा सदस्यांनी स्वस्थ बसू नये व वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्वस्थ बसू देऊ नये. नांदेड-मुंबई, नांदेड-पुणे नवीन डेली एक्सप्रेस मंजूर करून चालू केल्याशिवाय बैठक ठेऊच नये. 

- रितेश झांबड, उपाध्यक्ष, मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ, परभणी. 

गेल्या अनेक दिवसांपासूनच्या मागण्या प्रलंबित आहेत. सध्या मुंबई येथे जाण्यासाठी नांदेडहून तपोवन सोडली तर नंदीग्राम आणि देवगिरीशिवाय रेल्वे नाही. नवीन रेल्वे सुरू केल्यास प्रवाशांची गैरसोय होणार नाही. तसेच नांदेडचा मध्य रेल्वेत समावेश करावा, या प्रमुख मागण्यांवर विचार व्हावा, अशी अपेक्षा आहे.

- चैतन्यबापू देशमुख, नांदेड.

अकोला ते पूर्णा रेल्‍वे मार्गाचे ब्रॉडगेजचे काम होऊन एक तप पूर्ण होत आहे. हिंगोली येथे झालेल्या मार्गाच्या उद्‍घाटन कार्यक्रमात तत्‍कालीन रेल्‍वेमंत्री, राज्यमंत्री, रेल्‍वेचे जनरल मॅनेजर यांनी अकोला ते पूर्णा रेल्‍वे मार्गावरून मुंबईसाठी दैनिक रेल्‍वे मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही या मार्गावरून ही गाडी सुरू झालेली नाही. या मार्गावरील लोकप्रतिनिधींनी एकजुटीने पाठपुरावा करून मागणी पूर्ण करणे गरजेचे आहे.

 - गणेश साहू, सामाजिक कार्यकर्ते, हिंगाेली.   

अकोला ते पूर्णा रेल्‍वे मार्गावरून धावणाऱ्या पुणे, औरंगाबाद, पंढरपूर, नागपूर व मुंबई या गाड्यांच्या फेऱ्या वाढवून त्या साप्ताहिक गाड्या दैनिक करणे गरजेचे आहे. या बाबत रेल्‍वे संघर्ष समिती, प्रवासी संघटना, व्यापारी संघटना आदींनी वेळोवेळी रेल्‍वे प्रशासनाकडे निवेदने देऊनदेखील त्‍याकडे दुर्लक्ष होत आहे.

 -प्रा. शिवकुमार पराती, हिंगाेली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Labour Day : 1 मे ला कामगार दिवस का म्हटले जाते? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर

2024 च्या वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-२० मधून घेणार निवृत्ती- रिपोर्ट

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी ऑगस्टपर्यंत मुदत; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सवलत, पण शेतकऱ्यांची संमती पुनर्गठन आवश्यक

Maharashtra Day 2024: महाराष्ट्र दिनानिमित्त द्या खास अंदाजात मराठमोळ्या शुभेच्छा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT