पायरीवरून पाय निसटला आणि पाऊल पूर्ण वाकले. शस्त्रक्रियेनंतर पाऊल नीट झाले.
मामेबहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी मुंबईला गेले होते. लग्नघरी सर्व नातेवाईक भेटले. गप्पा-विनोद चालू होते. गुरुजींनी मुलीच्या मामाला मुलीला घेऊन येण्यास सांगितल्यावर एकच धांदल उडाली. लग्नमंडप खाली असल्याने जिन्यावरून खाली यायचे होते. कार्यालय नवीन असल्याने पायऱ्या व एकूणच बांधकाम नवेकोरे, अतिशय गुळगुळीत होते. मी मुलीच्या व मामाच्या मागून जिना घाईनेच उतरू लागले आणि... अचानक एक पायरीवरून पाय निसटला. मी थेट खाली जाऊन जोरात आपटले. काय झाले हे कळवयाच्या आतच डोळ्यापुढे आंधारी आली. हातातील अक्षता आपोआपच उंच उडाल्या. मी जोरात ओरडले. लग्न लागत असतानाच मागे असलेले चटकन धावत आले. मुलगा अमित व भाचा सिद्धार्थ धावले, मला उठता येईना. सर्वांनी उचलून खुर्चीवर बसविले. प्रचंड वेदना. पूर्ण पाय बधिर. डाव्या पायाचे पाऊल पूर्णपणे आत वळलेले. पाय वरपर्यंत सुजला, काही सुचेना. आता पुढे काय? लग्नघरच्या गडबडीत थांबणे शक्य नव्हते. धाकट्या बहिणीने तिच्याकडे कल्याणला चलण्याचा आग्रह केला. परंतु, वेळ घालविण्यात अर्थ नव्हता. त्यामुळे तिच्या घरी न जाता परस्पर अस्थिरोगतज्ज्ञाकडे गेलो. डॉक्टरांनी धीर दिला. तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार होती. तात्पुरते बॅंडेज करून एक इंजेक्शन देऊन त्यांनी पुण्यापर्यंतच्या प्रवासाला परवानगी दिली. इंजेक्शन व बॅंडेजमुळे पाय दुखणे थोडे कमी झाले. सायंकाळी पुण्यात घर गाठले. डॉ. रणजित देशमुख यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. सर्व प्राथमिक तपासण्या व्यवस्थित पार पडल्या. शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली. पाचव्या दिवशी घरी सोडण्यापूर्वी व्यायामाचा सराव करून घेण्यात आला व पुढील भेटीची तारीख मिळाली. नव्वद दिवस डावा पाय टेकावयाचा नाही. ही जबरदस्त शिक्षा झाली. पूर्ण दिवस बिछान्यावर पडून होते. या काळात डॉक्टरांची, परिचारिकांची, फिजिओ थेरपीस्टची, नातेवाइकांची, मित्रमैत्रिणींची, अनेकांची मदत झाली. आता पावले नीट चालू लागलीत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.