मुक्तपीठ

कथा एका पटकथेची

प्रभा कवठेकर

तुमच्या ‘बारी’ कादंबरीवर चित्रपट काढायचाय, असं सांगताच रणजित देसाई प्रचंड संतापले; पण ते जिद्दीनं त्याला सामोरे गेले...

‘नागीण’ हा माझे पती रमाकांत कवठेकर यांचा पहिला चित्रपट. त्याची कथा प्रसिद्ध लेखक रणजित देसाई (दादा) यांची होती. चित्रपटासाठी कथा पाहिजे म्हणून हे दादांना भेटायला गेले, तेव्हाचा प्रसंग. ‘बारी’ कादंबरीवर चित्रपट काढायचा म्हणून दादांना हे भेटायला कोवाडला, त्यांच्या घरी गेले होते. दादा म्हणजे मोठं प्रस्थ. सरदार माणूस. अत्यंत हुशार, प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व. हे त्यांच्या पाया पडले. दादांनी भेटायला यायचं कारण विचारताच, एका दमात यांनी सांगितलं, तुमच्या ‘बारी’ कादंबरीवर मला चित्रपट काढायचा आहे. त्याची परवानगी घेण्यासाठी मी आलो आहे. मानधन काय आहे वगैरे वगैरे...

दादा भयंकर संतापले. म्हणाले, ‘‘लांब केस वाढवले, शबनम बॅग गळ्यात अडकवली, झब्बा-पायजमा घातला, की तुम्हाला काय वाटतं तुम्ही फार शहाणे झालात का? स्वतःला काय समजता? तुमची योग्यता काय? एकदा स्वतःला पारखून पाहा. ‘बारी’ कादंबरी वाचली आहे का? चला सांगा मला कादंबरीविषयी. हे पण खूप जिद्दी व हट्टी होते. कादंबरी तर त्यांची पाठच होती. चित्रपट कसा करायचा पूर्णपणे डोक्‍यात होते. सर्व काही चर्चा झाली.

दादांच्या चेहऱ्यावर थोडंसं समाधान, आनंद दिसू लागला होता. तेवढ्यात ते म्हणाले, ‘‘मला १२७ पानांपर्यंतच कादंबरी आवडली. त्याच्यापुढं बदल करून पाहिजे आहे.’’ दादा खूपच संतापले. लालेलाल झाले. यांना म्हणाले, ‘‘बापाला शिकवतोस का? स्वतःला समजतोस तरी काय? रात्रीचं जेवण करायचं व चालतं व्हायचं. मला तोंडपण दाखवायचं नाही. रांडीचे इथं येतात आणि बापाला शिकवतात.’’ हे उठले, दुसऱ्या खोलीत गेले. रात्रभर विचार करत बसले. डोळ्याला डोळा नाही. काय करावं, समजत नव्हतं. सकाळी उठल्यावर यांनी दादांना देण्यासाठी स्वतः केलेली गणपतीची मूर्ती नेली होती. ती मूर्ती त्यांच्याजवळ ठेवली. दादांना नमस्कार केला व परत येण्यासाठी निघाले.

वाड्याच्या दारापाशी जातात न जातात तोच मोठ्याने आवाज आला, ‘‘रांडेच्या कुठं चाललास? वर ये, तुम्ही आमचे बाप निघालात. बदल काय पाहिजे, ते सांगा आणि लिहून घ्या.’’ हे दादांजवळ गेले. पुन्हा त्यांच्या पाया पडले. यांच्या डोळ्यांतून घळघळ अश्रू वाहात होते. दादांनी यांना जवळ घेतले आणि म्हणाले, ‘‘बाळा खूप मोठा होशील. काळजी करू नकोस. तू इथंच राहा. माझंच जेव, मला पैसे देण्याची काळजी करू नकोस. आजपासून तू माझा मुलगा झालास. तुला पाहिजे ते मी लिहून देतो.’’ अशा तऱ्हेनं ‘बारी’ कादंबरीवरील चित्रपटासाठी लिखाणाला सुरवात झाली.

बोलता बोलता यांची सर्व चौकशी केली. मग तर जास्तच प्रेमात पडले. कारण हे शून्यातून उभं राहणारं होते. दोन वेळा कोवाडला जाऊन यांनी लिखाण करून घेतलं. तेवढ्यात दादांना डोळ्यांचा खूप त्रास सुरू झाला. हे पण लिखाणात चांगलेच होते. त्यामुळं पुढचं लिखाण दादांच्या आशीर्वादाने यांनी पूर्ण केलं. दादांनी यांचे इतके लाड केले, की विचारायची सोय नाही. अप्रतिम जेवण, दादांच्या गप्पा ऐकताना यांच्या ताटातली भाकरी गार झाली, की चतकोर भाकरी खाल्ली असेल तरी ती बाजूला, दुसरी गरम भाकरी परत वाढायला सांगायचे.

‘नागीण’ चित्रपटाच्या प्रीमियरला येण्याचं दादांनी कबूल केलं होतं. त्यांच्या इच्छेनुसार आम्ही दोघं दादांना आमंत्रण करायला गेलो. माहेरी माझं स्वागत अप्रतिम झालं. गेल्यावर मी त्यांना पेढे दिले. वाकून नमस्कार केला. दादांनी मला आशीर्वाद दिला, ‘शतपुत्र भवः’. मी सहज त्यांना म्हटलं, दादा, एवढी शंभर मुलं आम्ही कशी सांभाळणार? दादा म्हणाले, ‘‘अगं, ‘नागीण’ हा तुमचा पहिला मुलगा (पहिला चित्रपट). असे तुम्ही शंभर चित्रपट काढा व प्रत्येक चित्रपटात शंभर मुलांची ताकद असू द्या.’’ त्यांचा आशीर्वाद समजून घेऊन अतिशय आनंदी झालो. तेव्हा दादांच्या सौभाग्यवतींनी माझी खणा-नारळानी ओटी भरली. भला मोठा ७-८ किलोचा डबा आम्हाला दिला व म्हणाले, की अगं तू बापाच्या घरून जाते आहेस. तुझ्या माहेराहून जात आहेस ना! मग त्या डब्यात तुला मांडे दिले आहेत, हे तुझ्या वाड्यात, तुझ्याकडं येणाऱ्या सगळ्यांना वाट.

यांच्या इच्छेप्रमाणे बदल करून दादांनी स्क्रिप्ट लिहिली होती. आमच्या नशिबानं त्यांना लिखाणाचं त्यावर्षीचं बक्षीस (राष्ट्रीय) मिळाले. पत्रकार परिषदेत दादांनी सांगितले, ‘‘या माझ्या लिखाणाला कारणीभूत माझा मुलगा आहे. हे त्याचं बक्षीस आहे. त्यांच्या आनंदासाठी ही भावली मी ठेवतो, पण, बक्षिसाचा हा चेक मी त्याला देतो.’’ हा केवळ त्यांचा मोठेपणा होता. कारण लेखक म्हणून, माणूस म्हणून ते एवढे मोठे होते, की मी त्यांच्याविषयी काय बोलावं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT