मुक्तपीठ

अंधारातील 'प्रकाश'

संतोष चोरडिया

'दिवाळी पहाटेच्या' दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. सर्व गायक, वादक, नर्तक उत्तम साथ देत होते; पण अजूनही खर्च आणि पैसे यांचा मेळ बसत नव्हता...

एकल सादरीकरण करणाऱ्या कलाकारांची "आम्ही एकपात्री, महाराष्ट्र' ही आमची राज्यस्तरीय संस्था. या संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षे आम्ही मनोरंजनाबरोबरच सामाजिक उपक्रमही राबवितो. वारकऱ्यांसाठी "हास्यदिंडी', मतदार जनजागृतीसाठी "हसत खेळत देऊ मत', मराठी राजभाषा दिनानिमित्त "ढंग मराठी, रंग मराठी', महिला दिनानिमित्त "विरंगुळा', तर पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त "एकपात्री दिन' असे विविध कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य करतो. यावर्षीच्या दिवाळीपूर्वी, वीसेक दिवस आधी "संवाद पुणे'चे सुनील महाजन यांचा मला, "आम्ही एकपात्री'चा अध्यक्ष या नात्याने फोन आला. ते म्हणाले, ""गुरुवारी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृह "दिवाळी पहाट'साठी कार्यक्रम करणार? मी क्षणाचीही विलंब न लावता हो म्हणालो. खरंतर कुठलाही रंगमंचीय कार्यक्रम करणे म्हणजे एकप्रकारे "लग्नकार्यच' असते. आमच्या कलाकारांची बैठक बोलविली आणि बऱ्यांच जणांनी यात सहभागी होण्याचे ठरविले. खूप खर्चिक असणारा हा कार्यक्रम हातात कमी अवधी असताना करणे, प्रायोजक मिळणे दुरापास्तच. त्यावर मार्ग काढला. सहभागी कलाकारांनी स्वतः काही रक्कम एकत्रित केली आणि कामाला सुरवात केली.

माझ्या डोक्‍यात हा "दिवाळी पहाट' कार्यक्रम नृत्य, गायन, वादन, विनोद अशा सर्व कलांनी परिपूर्ण असा भव्य-दिव्य करायचा मानस होता. साहजिकच त्याला सामाजिक कार्याची जोडही द्यायची होती, खऱ्या अर्थाने शिवधनुष्य उचलले होते.

मनोरंजनाबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून देवदासींच्या मुलांना, वंचितांना सांभाळणाऱ्या रेणूताई गावस्कर यांच्या "एकलव्य न्यासा'तील मुलांची आठवण झाली. दिव्यचक्षू मुला-मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहून रोजगार मिळवून देणारी "अद्वैत परिवार'तील दिव्यचक्षू रिना पाटील, संतोष डिंबळे आणि त्यांचे सहकारी डोळ्यांसमोर आले. महत्त्वाचे म्हणजे ज्या नाट्यगृहात आम्ही कलाकार अनेक वर्षे आमचे कार्यक्रम करीत असतो. त्या नाट्यगृहातील महिला सफाई कर्मचाऱ्यांना साडी, भेटवस्तू, फराळ, मुलांना फटाक्‍यांऐवजी पुस्तक भेट देऊन त्यांच्या दिवाळी सणाच्या आनंदात सहभागी करून त्यांना सन्मानित करण्याचे ठरविले. सहकारी कलाकारांनीही त्याला पाठिंबा दिला.

या "दिवाळी पहाटेच्या'दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. सर्व गायक, वादक, नर्तक उत्तम साथ देत होते, पण अजूनही खर्च आणि पैसे यांचा मेळ बसत नव्हता. पण कार्यक्रम ठरल्यानुसार करावयाचा हा दृढनिश्‍चय होता. कलाकारांनी आपआपल्या परीने खर्च उचलला, तर जिथं कमी तिथं मी हे होतेच. या धावपळीत आम्ही आमची दिवाळी विसरलो. प्रत्येकाच्या घरात कमी अधिक प्रमाणात नाराजी व्यक्त होत होती. पण आमच्या सर्वांसमोर या मुलांसाठी भेटवस्तू, महिलांसाठी साड्या आणणे, फराळ पॅंकिंग हेच एकमेव आव्हान होते. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी केव्हा सरले समजलेच नाही.

गुरुवार, लक्ष्मीपूजनाची पहाट उजाडली. पहाटे पाच वाजताच आम्ही नाट्यगृहांवर जमलो. गणेश वंदनेने मंगलमय सुरवात झाली. कार्यक्रमाच्या मध्यावर वंचितांचा सन्मान सोहळा सुरू झाला. बालसाहित्यिक राजीव तांबे, उद्योजक सुरेश कोते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणुताई गावस्कर अशांची व्यासपीठावर उपस्थिती होती. एकलव्य न्यासाची मुलं. मुली सन्मानित होताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्व काही सांगत होता. ती भारावली होती, हरखली होती. "अद्वैत परिवारा'च्या रिना पाटील, शहनाज तर नाट्यगृहातील महिला सफाई कर्मचाऱ्यांना साडी, भेटवस्तू, फराळ, पुस्तके देऊन सन्मानित केले. त्यानंतर दोनच दिवसांनी कार्यक्रमानिमित्ताने नाट्यगृहावर गेलो तेव्हा तिथल्या महिला कर्मचारी म्हणाल्या, "यानिमित्ताने आयुष्यात पहिल्यांदाच वर्तमानपत्रात आमचे फोटो आणि नावं छापून आली. सणाच्या दिवसांत पहिल्यांदाच कोणीतरी आमची दखल घेतली'. हे सांगत असताना प्रत्येकीचे डोळे पाणावले होते.

या सोहळ्यात ज्यांना सन्मानित केल होतं त्या सर्व मुली, महिला होत्या आणि लक्ष्मीपूजनाचा तो दिवस होता. मनामध्ये विचार आला यांच्या सन्मानानेच हेच आपले "लक्ष्मीपूजन' झाले आहे. त्यादिवशी घरी संध्याकाळी जी लक्ष्मीपूजन केले ते केवळ औपचारिकतेचा भाग म्हणून. दिवाळी म्हणजेच दीपोत्सव. तिमिरातून तेजाकडे, विचारातून विवेकाकडे, अंधारातून प्रकाशाकडे... असंही जीवन जगायचं असतं, मानवतेच्या अथांग सागरातून माणुसकीची नाव चालवत जीवनाच्या पैलतिराला पोचायचे असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT