मुंबई

बिबट्याच्या बछड्याचा येऊरला मॉर्निंग वॉक! 

सकाळ वृत्तसेवा


ठाणे : निसर्गरम्य येऊरच्या वातावरणात मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांची नेहमीचीच "धाव-पळ' सुरू होती. अचानक कुणाला तरी झाडीतून मांजरासारखा आवाज आला. नीट पाहिले तर एक छोटे पिल्लू डोळे किलकिले करून पाहत होते. थोडे निरखून पाहिल्यावर ते मांजराचे पिल्लू नव्हे , तर बिबट्याचा बछडा असल्याचे कळले; मग मात्र त्याची आई आजुबाजूला असण्याच्या शक्‍यतेमुळे खरोखरच धावपळ करावी लागेल की काय, असे तिथल्या नागरिकांना वाटू लागले. दरम्यान, तो बछडा मात्र आनंदाने तिथे बागडू लागला. त्याचा हा मॉर्निंग वॉक पाहण्यासाठी आणि मोबाईलमध्ये टिपण्यासाठी मग तिथे एकच गर्दी झाली...

 त्याची आई, म्हणजेच मादी बिबट्या आजूबाजूला असण्याची शक्‍यता असल्याने अनवस्था प्रसंग टाळण्यासाठी काही नागरिकांनी वनविभागाला हे कळवले. त्यांनीही तातडीने येऊन या अंदाजे वय वर्षे चार दिवस असलेल्या बछड्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर आवश्‍यक उपचार करून त्याची पुन्हा त्याच्या आईशी भेट घडवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही वनाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

ठाण्याच्या वेशीवर असलेल्या येऊर येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. तिथे अनेक वन्य प्राण्यांचा वावर असल्याचे सांगितले जाते. काही महिन्यांपूर्वी (20 फेब्रुवारी रोजी) याच जंगलातून आलेल्या बिबट्याने ठाण्यातील मॉल व हॉटेलची सैर करून धमाल उडवून दिली होती; तर 26 जून रोजी पहाटे ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मानपाडा परिसरातील वनविभागाच्या फुलपाखरू उद्यानात बिबट्या अवतरला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा येऊरमध्ये बिबट्याच्या बछड्याने बुधवारी पहाटे (ता. 4) पुन्हा दर्शन दिले आहे. 

येऊरमधील एअरफोर्स बेसनजीक हा बछडा काहींना दिसला. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांचा वावर येथे मोठ्या प्रमाणावर असतो. तेथेच व्यायाम करणाऱ्या एकाला खडकाजवळच्या झुडपात हा चिमुकला डोळे किलकिले करून पाहताना दिसला. सुरुवातीला या बछड्याची आई, म्हणजेच बिबट्याची मादी तिथेच कुठेतरी दबा धरून बसलेली असावी, अशी शंका त्यांच्या मनात आली.

त्यामुळे मनात धास्ती बाळगतच त्याचे फोटोसेशन झाले. वनविभागाचे कर्मचारी आल्यावर बिबट्याची मादी आसपास नसल्याची खात्री करून त्यांनी त्याला अलगद हातात उचलून घेतले. त्यानंतर वनाधिकाऱ्यांनी या बछड्यावर बोरिवली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्याचे ठरवले आहे; मात्र या बछड्याची आपल्या आईबरोबर ताटातूट होऊ नये म्हणून उपचारानंतर त्याला पुन्हा येऊरमधील त्याच ठिकाणी सोडले जाईल, अशी माहिती वनाधिकारी राजेंद्र पवार यांनी दिली. 

परिसर काही काळ संरक्षित 
येऊरचा हा भाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असल्याने येथे वन्यप्राण्यांचा सर्रास वावर असतो. हा वन्यप्राण्यांचा नैसर्गिक अधिवास असल्याने बबट्याची मादी बछड्यासह येथे वावरत असावी, असा अंदाज आहे. मातेशी ताटातूट होऊ नये म्हणून या बछड्याला पुन्हा त्याच ठिकाणी ठेवून हा परिसर काही काळासाठी संरक्षित ठेवला जाणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : सीएसकेची संथ सुरूवात; भुवनेश्वरनं दिला पहिला धक्का

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : हनुमानाची भूमी काँग्रेसला माफ करणार नाही- पीएम मोदी

SCROLL FOR NEXT