मुंबई : मंगळवारी सुरु झालेल्या गणेशोत्सवामुळे मुंबईतील वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले आहे. तर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशाच्या कानोकोपऱ्यातून मोठ्या संख्यने नागरिक मुंबईत दाखल होत आहे. मध्य मुंबईत गणेशभक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे वातावरण आनंददायी आणि उल्हासाचे आहे.
मध्य मुंबईतील गणेशोत्सव हा राज्यभरातील गणेशभक्तांच्या आकर्षणाचा विषय आहे. पूर्वीपासूनच राज्याच्या कानोकोपऱ्यातून नागरिक येथे दर्शनासाठी येत असतात. अशातच लालबागच्या राजाच्या वाढत्या प्रसिद्धीमुळे मागील ४ ते ५ वर्षांपासून लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांची संख्या लाखोंवर गेली आहे.
अशातच मंगळवार ता.१९ रोजी सुरु झालेल्या गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक आले होते. यासोबतच गणेशगल्लीचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणीच्या दर्शनासाठीही गरसदी वाढतेय. तर घरगुती आणि चाळींतील गणपतींच्या आगमनामुळे या परिसरातील वातावरण भक्तिमय झाले आहे.
व्हीव्हीआयपींचा थाट तर सर्वसामान्यांची बिकट वाट
लालबागच्या राजाची वाढत्या प्रसिद्धीमुळे देशाच्या कानोकोपऱ्यातून नागरिक येथे दर्शनासाठी येत आहेत. मात्र याचवेळी राजकीय नेते, कार्यकर्ते, बॉलिवूड अभिनेते, मंत्री हेदेखील लालबागच्या राजा चरणी दर्शनासाठी येत असतात.
यासर्वांना व्हीव्हीआयपी प्रवेश देत तात्काळ दर्शनासाठी जाता येते. मात्र दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना ३-३ तास दर्शन रांगेतून दर्शनासाठी जाऊनही पोलीस आणि मंडळ प्रशासनाकडून धक्काबुक्की करण्यात येत असल्याने नागरिकांकडून मंडळ प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. "आम्ही पहाटे पासून रांगेत उभे आहोत.
माझ्यासोबत माझी बहीण, आई आणि वडील असे आम्ही सर्व हैदराबादहून दर्शनासाठी आलो आहोत. इतक्या लांबून येऊन आम्ही ३ तास रांगेत उभं राहिलो आणि दर्शनासाठी पुढे गेलो तर माझ्या आई आणि बहिणीला पोलिसांनी जोरात पुढे ढकलून दिले.
आम्ही तिरुपतीला जातो तुमच्या महाराष्ट्रातूनही अनेक नागरिक येतात, जगभरातून लोक येतात. मात्र अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन रांगा पुढे जातात आणि अतिशय उत्तम दर्शन घेता येते. इथला प्रकार बघून अत्यंत वाईट वाटले", अशी खंत हैदराबादहून आलेल्या गणेशभक्ताने व्यक्त केली.
छोट्या व्यावसायिकांना 'अच्छे दिन'
लालबाग, परळ आणि आजूबाजूच्या परिसरात गणेशभक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे याभागाला जत्रेचे स्वरूप आले आहे. त्यामुळे पूजासाहित्य विकणारे छोटे व्यावसायिक, हार-फुलांच्या माळा, विविध अगरबत्त्या, शोभेच्या वस्तू, खाऊची दुकाने, प्रसादाची विक्री करणाऱ्या छोट्या दुकानदारांच्या वस्तुंना मागणी आहे. तर खेळण्यांची दुकाने, लाईटच्या माळा यांनी दुकाने सजले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.