मुंबई

Mumbai Rains : जीवनवाहिनी रुळांवर नव्हे; पाण्यात!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईची लाईफ लाईन सोमवारी (ता. १) कोलमडली. सकाळीच मरीन लाईन्स स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे पश्‍चिम रेल्वे आणि पावसाचे पाणी रुळांवर आल्यामुळे मध्य रेल्वे विस्कळित झाली. लोणावळ्याजवळ मालगाडी घसरल्यामुळे मुंबई-पुणे मार्गावरील एक्‍स्प्रेस गाड्या रद्द झाल्या. त्यामुळे दिवसभर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

सोमवारी आठवड्यातील पहिल्याच दिवशी कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना लोकलच्या गोंधळाचा फटका बसला. सकाळीच पश्‍चिम रेल्वेच्या मरीन लाईन्स स्थानकात बांधकामासाठी लावलेले बांबू पडून ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे सुमारे तीन तास लोकल सेवा विस्कळित झाली होती. परिणामी चर्चगेट ते मरीन लाईन्स स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली; सर्व गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. काही लोकल मुंबई सेंट्रलहून मागे फिरवण्यात आल्या. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली. या गोंधळामुळे बोरिवलीपर्यंत सर्व स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. 

मध्य रेल्वेच्या कुर्ला, शीव, माटुंगा स्थानकांदरम्यान रूळ पाण्याखाली गेल्यामुळे लोकल सेवा विस्कळित झाली. मध्य रेल्वेवर कुर्ला, शीव, माटुंगा या स्थानकांदरम्यान पाणी साचल्याने लोकल सेवा विस्कळित झाली होती. हार्बर मार्गावर मानखुर्द ते गोवंडी स्थानकांदरम्यान रूळ पाण्याखाली गेल्यामुळे दोन्ही दिशांकडील वाहतूक मंदावली. त्यामुळे सकाळी काही वेळासाठी वडाळा स्थानकात लोकलच्या वेगावर निर्बंध घालण्यात आले होते. रेल्वेमार्गावर साचलेले पाणी आणि उशिरा धावणाऱ्या लोकल अशा परिस्थितीमुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांनी लोकलमधून उतरून रुळांवरून पायपीट केली. 

शहरात ४६, पूर्व उपनगरात १२ आणि पश्‍चिम उपनगरात ३९ ठिकाणी झाडे व फांद्या पडण्याच्या तक्रारी आल्या. पावसाळा सुरू  झाल्यापासून आतापर्यंत ५७८ फांद्या कोसळल्या आणि २०० पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली, तर शहरात ९, पूर्व उपगनरात ७ व पश्‍चिम उपनगरात ६ अशा एकूण १९ ठिकाणी घराच्या भिंतींचा भाग पडण्याच्या तक्रारी आल्या.

कडक सुरक्षा व्यवस्था 
जवळपास सर्व स्थानकांत प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती. गर्दीमुळे चेंगराचेंगरी वा अन्य अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) ४८४ जवान, १२८ महिला पोलिस तैनात करण्यात आले होते. 

उद्‌घोषणांचा अभाव
लोकल वाहतूक विस्कळित झाल्यावर रेल्वे प्रशासनाने उद्‌घोषणेद्वारा प्रवाशांना माहिती देण्याची अपेक्षा असते. परंतु सोमवारी कोणत्याही स्थानकात उद्‌घोषणा होत नसल्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला. रेल्वेच्या या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला जात होता. 

सायंकाळीही ‘यातायात’
तिन्ही रेल्वे मार्गांवरील लोकलनी सकाळी निघालेले नोकरदार दोन ते तीन तास उशिराने कार्यालयांत पोहोचले. दुपारी पावसाने थोडी विश्रांती घेतली; मात्र सायंकाळी संततधार सुरू झाल्यामुळे प्रवाशांना घरी पोहोचण्यासाठी पुन्हा ‘यातायात’ करावी लागली. पश्‍चिम रेल्वेवरील १००, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ५२ व हार्बर मार्गावरील ३१ लोकल रद्द करण्यात आल्या. 

‘जॉली ब्रदर्स’विरोधात गुन्हा 
कांजूरमार्ग येथील प्रसिद्ध जॉली ब्रदर्स कंपनीविरोधात महापालिकेने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी मुसळधार पावसात कांजूरमार्ग येथे पाणी तुंबल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती. त्या वेळी नाल्यात मातीचा भराव आणि डेब्रिज टाकल्याचे आढळले. जॉली ब्रदर्स कंपनीकडून हा भराव टाकल्याचा दावा करत पालिकेने कंपनीविरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

लोकलमध्ये बिघाड
सीएसएमटीहून बेलापूरकडे जाणाऱ्या लोकलमध्ये रात्री ९च्या सुमारास वडाळा स्थानकात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे  ४५ मिनिटे वाहतूक विस्कळित झाली होती.  
मार्गांत बदल
भुसावळ-पुणे एक्‍स्प्रेस नाशिक रोड स्थानकापर्यंतच चालवण्यात आली. मुंबई-पुणे मार्गावरील काही रेल्वे गाड्या इगतपुरीमार्गे वळवण्यात आल्या. पुणे-सांत्रागाछी एक्‍स्प्रेस दौंड-मनमाडमार्गे चालवण्यात आली.

मुंबई-पुणे वाहतूक ठप्प 
सोमवारी पहाटे मध्य रेल्वेच्या कर्जत ते लोणावळा  घाटमार्गावर जामरुंग ते ठाकरवाडी स्थानकांदरम्यान मालगाडीचे १६ डबे रुळांवरून घसरले. त्यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला. परिणामी इंद्रायणी एक्‍स्प्रेस, इंटरसिटी एक्‍स्प्रेस, डेक्कन क्वीन, डेक्कन एक्‍स्प्रेस, प्रगती एक्‍स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: केएल राहुलने जिंकला टॉस, लखनौ संघात मोठा बदल; जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT