Political Controversy
Political Controversy  
मुंबई

राणा नमले, कडू आक्रमक : शिंदे-फडणवीसांची मध्यस्थी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : माजी मंत्री आमदार बच्चू कडू आणि भाजप समर्थक आमदार रवी राणा यांच्यातील वाद मिटविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला. या दोघांनी कान टोचल्याने राणा यांनी खोक्यांचा आरोप मागे घेतला आणि दिलगिरी सोमवारी व्यक्त केली. परंतु, राणा यांच्या पवित्र्यामुळे दुखावलेल्या कडू यांनी कार्यकर्त्यांसोबत बोलून पुढची भूमिका ठरविणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

कडू हे नेमकी काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. दरम्यान, वाद संपविण्याचा प्रयत्न केल्याने कडू यांनी शिंदे, फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

कडू आणि राणा यांच्यातील टोकाच्या आरोप-प्रत्यारोपामुळे सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. खोक्यांच्या मुद्यावरून विरोधक शिंदे गटाला हिणवत असतानाच मित्रपक्ष भाजपसोबत असलेल्या राणा यांनी कडू यांच्यावर ‘खोके’ घेतल्याचा आरोप केला.

त्यावरून आक्रमक झालेल्या कडू यांनी राणा यांच्याविरोधात दंड थोपटून वेगळी भूमिका घेण्याचा इरादा बोलून दाखविला आहे. हा वाद वाढण्याच्या शक्यतेने शेवटी शिंदे आणि फडणवीस यांनी यांनी पुढाकार घेत, शिंदे यांनी रविवारी रात्री उशिरा राणा यांच्याशी चर्चा केली.

राणा यांनी आज सकाळी फडणवीस यांची भेट घेऊन कडू यांच्यासोबतच्या वादातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतरही कडू आक्रमक राहिल्याचे माध्यमांशी बोलताना दिसून आले. माझ्यासाठी कार्यकर्ते महत्त्वाचे असून, त्यांच्याशी चर्चा करून राणासोबतच्या वादावर निर्णय घेणार असल्याचे कडू यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘‘आरोप झाल्यानंतर गप्प राहिलो असतो तर लोकांनी मला बदनाम केले असते. त्यामुळे आरोपांना प्रत्युत्तर दिल्याने वाईट किंवा चुकीचे केले मला वाटत नाही. या वादात आयुष्य घालवणार नाही. ’’

भूमिका उद्या जाहीर करणार

‘‘शिंदे आणि फडणवीस यांनी हे प्रकरण चांगल्या प्रकारे हाताळले आहे. पण आपल्या कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत. त्यांच्याशी चर्चा करून नंतर पुढील निर्णय घेणार आहे. मंगळवारी (ता.१) दुपारी कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला संपूर्ण राज्यातून कार्यकर्ते येणार आहेत.

एखाद्या चळवळीच्या कार्यकर्त्यावर आरोप होऊन त्याचे आयुष्य बरबाद होत असेल तर आवाज उठवणे महत्त्वाचे आहे. रवी राणांची दिलगिरी, शिंदे आणि फडणवीस यांनी केलेली मध्यस्थी हे सर्व कार्यकर्त्यांसमोर मांडतो. त्यावर कार्यकर्ते काय म्हणतात याचा संपूर्ण विचार करून उद्या आम्ही आमची भूमिका स्पष्ट करतो,’’ असे बच्चू कडू यांनी सांगितले.

‘खोक्यांचे सत्य समोर येऊ नये म्हणूनच समेट’

‘‘गुवाहाटी येथील खोक्यांच्या चर्चेचे सत्य राज्यातील जनतेसमोर कधीच येऊ नये म्हणूनच आज मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री यांनी आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्याशी चर्चा करून समेट घडवून आणला, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आज केला. सुरतमार्गे गुवाहाटीतील खोक्यांचे सत्य जनतेसमोर येणे अपेक्षित होते मात्र ज्या पद्धतीने दोघांना गप्प बसण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यावरून काही काळ तरी जाईल;मात्र खोक्यांचे सत्य एक ना एक दिवस जनतेसमोर नक्कीच येईल अशी आशा तपासे यांनी व्यक्त केली.

विखेंवर निशाणा

भारतीय जनता पक्षाने ठरवले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपामध्ये विलीन होईल, असा दावा खासदार सुजय विखे यांनी केला होता. यावर उत्तर देताना तपासे म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती ही स्वाभिमानाच्या मुद्द्यावर झाली याची कल्पना खासदार सुजय विखे पाटील यांना नसावी. ‘राष्ट्रवादी’चे सर्वेसर्वा हे पवार कुटुंब आहे, विखे कुटुंब नाही.’’ जे विखे कुटुंब सत्तेसाठी इकडे तिकडे कुठल्याही पक्षात विलीन होते, त्यांनी टीका करु नये, असे त्यांनी सुनावले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unseasonal Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला इशारा! जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपिटीची शक्यता

Loksabha Election 2024 : पाचव्या टप्प्यात मुंबई बनणार ‘रणभूमी’; पंतप्रधानांचा रोड शो आणि सभांचे नियोजन

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 मे 2024

अग्रलेख : कोसळणारे भ्रष्ट मनोरे...

Water Storage : राज्यात केवळ २५ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT