वसई, ता. २४ (बातमीदार) ः वसई-विरार शहरात पाण्याची अनियमितता, अपुरा पुरवठा व कपातीचे वेळापत्रक जाहीर केल्याने वसई प्रभागातील अधिकाऱ्यांना घेराव घालत महिलांनी संताप व्यक्त केला. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून पालिका मुख्यालयावर धडक देण्याचा इशारा या वेळी महिला आंदोलकांनी दिला आहे. त्यामुळे वसई-विरारमधील पाणीप्रश्न तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
धरणात साठा असताना उन्हाळ्यातच पाणी कपातीचे वेळापत्रक का आखले, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होऊ लागला आहे. हातीमोहल्ला, कोळीवाडा, वसई गाव पाली, नायगाव व आजूबाजूच्या परिसरात पाणी काही मिनिटेच सोडले जाते. ते अपुरे असते. गेले ३ दिवस पाणीच आले नाही, असा आरोप नागरिकांडून केला जात आहे. अनेक गृहसंकुलांना पाणी मिळत नाही. ज्यांना पाणीपुरवठा होतो तो रहिवाशांच्या संख्येपेक्षा फारच कमी स्वरूपात आहे. गरीब घटकातील नागरिकांना महागडे पाणी घेणे परवडत नाही. शहरात बोअरवेल किंवा अन्य पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. त्यामुळे महापालिकेला जाब विचारण्यासाठी नागरिकांनी थेट वसई प्रभाग समिती कार्यालयाला धडक दिली.
वसई-विरार शहर जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष ओनिल अल्मेडा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्यालय सरचिटणीस किरण शिंदे, वसई-शहर अल्पसंख्याक अध्यक्ष सलिम खिमाणी आणि पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा अधिकारी प्रकाश साटम, सहाय्यक आयुक्त लक्ष्मी मुंबारकर यांच्याशी पाणी समस्येबाबत चर्चा केली. यावेळी प्रकाश साटम यांनी याबाबत सकारात्मक पावले उचलून ज्याठिकाणी पाण्याची समस्या उद्भवत आहे ती दूर केली जाईल, असे आश्वासन दिले.
-----------
उन्हाळा सुरू असताना पाणी कपात केली जात आहे. वसई, नायगावमध्ये जलवाहिन्या जुन्याच आहेत. अनेक वेळा यासंदर्भात पाठपुरावा करूनदेखील पालिका उदासीन भूमिका घेत असेल तर काँग्रेस मुख्यालयावर धडक देणार.
- किरण शिंदे, जिल्हा कार्यालय सरचिटणीस, काँग्रेस.
----------
वसई-विरार महापालिकेचे पाणी येत नाही. त्यामुळे रोजच समस्या निर्माण होत आहे. पाण्यापासून वंचित न ठेवता सुरळीत पुरवठा प्रशासनाने करावा व गृहिणींना दिलासा द्यावा.
- सुनीता दांडेकर, गृहिणी, वसई गाव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.