सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १७ : मतदानासाठी दोन दिवस शिल्लक असल्याने प्रत्येक उमेदवार गावागावांत पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे प्रचार करीत आहेत. नोकरदारवर्गासाठी रविवारी सुटी असल्याने जिल्ह्यातील शहरी भागात राजकीय नेत्यांनी प्रचाराची संधी साधत प्रचाराची राळ उठवली. उन्हातान्हाची पर्वा न करता सकाळपासूनच उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांच्या भेटीसाठी पदयात्रा आणि रॅलींवर विशेष भर दिला होता. रविवारी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र भेटत असल्याने या संधीचा उमेदवारांनी पुरेपूर फायदा घेतला. पंधरा दिवस ग्रामीण भागात निवडणूक प्रचार करत शेवटच्या दिवसात शहरी लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न उमेदवार करीत आहेत.
सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे प्रचाराचा राहिलेला अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न प्रत्येक उमेदवार करीत आहे. त्यामुळे रविवारी दिवसभर प्रमुख बाजारपेठा, तालुक्याची ठिकाणे येथे उमेदवारांची प्रचार वाहने फिरताना दिसली. रविवारची सकाळपासूनच उमेदवारांची सुरू झालेली धावपळ दुपारच्या वेळेत थोडीशी मंदावली होती. संध्याकाळी पुन्हा रॅली काढत प्रचाराचा धुरळा उडाला.
प्रमुख उमेदवारांसोबतच अपक्ष उमेदवारांमध्येही प्रचाराचा जोर दिसून आला. रायगड जिल्ह्यात अलिबाग, कर्जत या ठिकाणी चुरशीच्या लढती होत आहेत. त्यामुळे मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांसह अपक्ष उमेदवार राहिलेल्या मतदारांपर्यंत पोहोचत मतदानाच्या मतदार केंद्राबाबत पावती देत मतदारांची खात्री करून घेत आहेत. शहरी भागात पावती वाटपाचे काम रविवारपासून सुरू झाले असून पुढील तीन दिवस घरोघरी जाऊन दिवस-रात्र छुपा प्रचार करण्यात कार्यकर्ते मग्न असणार आहेत. प्रचारात कोणतीही उणीव राहू नये, यासाठी उमेदवार, त्यांचे खंदे समर्थक, प्रमुख कार्यकर्ते शेवटच्या टप्प्यात घाम गाळत असल्याचे दिसून येत होते.
अलिबाग, कर्जत, महाडमध्ये चुरशीची लढत
रायगड जिल्ह्यात सर्वाधिक चुरशीची लढत अलिबाग विधानसभेची होणार असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघात शेकापच्या चित्रलेखा पाटील या पहिलीच निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्याविरोधात शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती अपक्ष उमेदवार दिलीप भोईर यांच्यासह अन्य ११ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अशाच प्रकारची लढत कर्जत मतदारसंघात होत आहे. शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी दंड थोपटले आहेत. यातच ठाकरे गटाचे नितीन सावंत यांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे. श्रीवर्धन मतदारसंघातील अपक्ष उमेदवार कृष्णा कोबनाक यांनी रविवारचा दिवस म्हसळा शहरासाठी राखीव ठेवला होता. महाडमध्येही शिंदे गटाचे भरत गोगावले, ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांनी शहरी भागातील मतदारांशी संपर्क साधला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.