तीन हजार हेक्टरवर होणार फळलागवड
भातशेतीपेक्षा फळपिकांमधून जास्त उत्पन्न; हापूस आंब्याला सर्वाधिक पसंती
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ३१ ः मॉन्सून सुरू होताच रायगड जिल्ह्यात फळबाग लागवडीची लगबग सुरू झाली आहे. यंदा जिल्ह्यात तीन हजार हेक्टरवर फळलागवड नव्याने केली जाणार आहे. पारंपरिक भातशेती परवडत नसल्याने रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फळझाडे लागवडीकडे लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे २५ ते ३० वर्षांपूर्वी फक्त किनारपट्टीवरील भागात मर्यादित असलेले फळझाड क्षेत्र विस्तारले जात आहे.
जिल्ह्यातील विविध रोपवाटिकांमधील तीन लाख ७७ हजार १६१ रोपे तयार झाली आहेत. ही रोपे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यातील शेतकरी भातशेती परवडत नसल्याने फळबाग लागवडीकडे अधिक आकर्षित होत आहेत. यासाठी निसर्ग चक्रीवादळानंतर प्रोत्साहनपर योजना कोकणासाठी राबवण्यात आल्या. याचा लाभ घेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील फळझाडांचे क्षेत्र दरवर्षी वाढवत नेले. यात काजू, नारळ, सुपारीपेक्षा हापूस आंबा लागवडीला अधिक प्राधान्य दिले आहे. त्यात दरवर्षी साधारण चार ते पाच हजार हेक्टरची वाढ होत असून शेतकऱ्यांनी फळझाडे लागवडीची कास धरल्याचे दिसून येत आहे.
फळझाडे लागवड किफायतशीर
पावसाची अनियमितता, सिंचनासाठी पाण्याची कमतरता, जमिनीचा दर्जा यावर ही फळझाडे लागवड किफायतशीर ठरत आहे. जिल्ह्यातील फळझाडे बागायतीचे एकूण क्षेत्र ६९ हजार हेक्टरपर्यंत गेले आहे. जे खरीप हंगामातील एकूण लागवडक्षम क्षेत्राच्या ६० टक्के आहे. कागदोपत्री रायगडात एक लाख २० हजारांच्या आसपास खरीप पिकाखाली आहे; मात्र प्रत्यक्षात जेमतेम ९० हजारांच्या आसपास खरीप हंगामात लागवड होते. यात नाचणी, भात, मूग यांसारख्या पिकांचाही समावेश आहे.
फळबागायतीसाठी विमा
रायगड जिल्ह्यात भातशेतीपेक्षा फळबागायतीसाठी विमा काढण्याचा प्रयत्न जास्त आहे. फळझाड नुकसान झाले तर केवळ एक रुपयात विमा काढता येत असल्याने फळझाडे बागायतदारांना हमखास सुरक्षा कवच मिळालेले आहे. जास्तीत जास्त नफा मिळविण्यावर येथील शेतकऱ्यांचा भर आहे; मात्र असे न करता शेतकऱ्यांनी रासायनिक कीटकनाशके, खते, संप्रेरक यांचा वापर टाळला पाहिजे. यावर्षी जिल्ह्यात शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीची माहिती दिली जात असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक, अधिकारी वंदना शिंदे यांनी सांगितले.
फळ लागवडीतील वाढ
सन / २०२०-२१/२०२१-२२/२०२२-२३/२०२३-२४/२०२४-२५/२०२५-२६ नियोजित
आंबा / १०९४.०९/ १११७.६३/१४२३.७३/१३२५.०९/१२७९.४१/१५००.००/
काजू /१९५.४५/१६३.९२/२३२.२३/२४८.०८/१४२.५६/९००.००/
इतर /९६.९७/१०३.४/३४२.८८/२४९.९०/१६६.३१/६४५.००/
एकूण /१३८६.५१/१३८४.९५/१९९८.८/१८२३.०७/१५८८.२८/३०४५.००/
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.