गोड्या पाण्यातील माशांची मेजवानी
पालीमध्ये खरेदीसाठी खवय्यांची धाव
पाली, ता. ३० (वार्ताहर) ः परतीच्या पावसामुळे नदी, तलाव, ओहळ शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. त्यामुळे गोड्या पाण्यातील मासेमारी जोरात सुरू आहे. सध्या गोड्या पाण्यातील विविध मासे मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. खवय्यांच्या उड्या चविष्ट गोड्या पाण्यातील माशांवर पडत आहेत. हे मासे सध्या मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध होत असल्याने खवय्यांना मेजवानी मिळत आहे.
नद्या, तलाव, धरण, पाणवठे, ओढे, ओहळ, शेततळे अशा गोड्या पाण्यात सापडणाऱ्या माशांची आवक मागील दोन दिवसांपासून वाढली आहे. यामध्ये मळे, कोलीम, म्हुऱ्या, शिवडा, अरलय, वाम, कोळंबी, कटला, फंटूस व खवल अशा माशांचा समावेश आहे. मळे व म्हुऱ्या हा प्रकार या दिवसांत अधिक मिळतो. त्यामुळे खवय्ये आवर्जून खरेदी करतात. काही जण तर मुंबई, ठाणे अशा शहरांत राहणाऱ्या आपल्या नातेवाइकांनादेखील भेट देतात. कोळी बांधवांबरोबरच प्रामुख्याने आदिवासी आणि गळभोई समाजातील नागरिक मेहनतीने हे मासे व चिंबोऱ्या पकडतात. हे विकून त्यांच्या हाती चार पैसे मिळतात. नदी, तळे, धरण येथे टायर ट्युबवर बसून गाळाने व जाळी टाकून मासेमारी केली जाते. तर शेतातील साठलेले पाणी काढून मासे पकडले जातात. सध्या गोडे मासे मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. त्यामुळे उदरनिर्वाह चांगला सुरू आहे.
...................
माणगाव येथील गृहिणी प्रियांका हेमंत गोसावी यांनी सांगितले, की सध्या गोड्या पाण्यातील मासे बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत. शहरात असणाऱ्या नातेवाइकांना आवर्जून भेट म्हणून गोडे मासे दिले जात आहेत. मळे, शिवडा, कटला व म्हुऱ्या हे मासे अनेकांना खूप आवडतात.
.....................
जिल्ह्यात विविध ठिकाणी वेगवेगळ्या किमती आहेत.
मळे - ५० ते ८० रुपये पाव तर २०० ते २५० रुपये किलो.
कोलीम (बारीक कोळंबी) - यावर्षी ५० ते ६० रुपये वाटा (एका पानावर वाटा असतो.)
म्हुऱ्या - ५० ते ६० रुपये वाटा (एका पानावर वाटा असतो.)
शिवडा, कटला व वाम - ५०० ते ६०० रुपये किलो.
मोठी गोडी कोळंबी - १,००० ते १,२०० रुपये किलो.
फंटूस - ३०० ते ४०० रुपये किलो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.