दुर्गम वाटा चालत ऐतिहासिक वारशाचा जागर
शिवजयंतीनिमित्त सरसगड किल्ल्याला ८३ दुर्गप्रेमींची प्रदक्षिणा
पाली, ता. १९ : शिवजयंतीच्या औचित्याने पाली सुधागड संघर्ष संस्थेच्या वतीने आयोजित सरसगड प्रदक्षिणा उत्साहात पार पडली. रायगड प्रदक्षिणेच्या धर्तीवर राबविण्यात आलेल्या या उपक्रमात तब्बल ८३ दुर्गप्रेमींनी सहभाग घेत दुर्गम वाटा पार करत गडाच्या ऐतिहासिक वारशाला अभिवादन केले. लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील सहभागींचा उत्साह विशेष उल्लेखनीय ठरला.
पहाटे ६ वाजता सुरू झालेल्या या मोहिमेदरम्यान सरसगडाचा घेरा, तटबंदी, नैसर्गिक साधनसंपत्ती तसेच गडाची भौगोलिक रचना यांची माहिती सहभागींस देण्यात आली. प्रा. महेश बारमुख आणि विजय काटकर यांनी शिवकालीन इतिहासातील सरसगडाचे महत्त्व सविस्तरपणे उलगडून सांगितले. लहानग्या शाहीर युवराज पाटील याने सादर केलेल्या पोवाड्याने वातावरण भारावून गेले. मागील वर्षी ५३ जणांनी सहभाग घेतला होता, यंदा ही संख्या ८३ वर पोहोचल्याने दुर्गप्रेमींच्या वाढत्या प्रतिसादाचे चित्र स्पष्ट झाले, अशी माहिती आयोजक कपिल पाटील यांनी दिली.
यशस्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या सर्वांना संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमासाठी कपिल पाटील, अमित निंबाळकर, प्रदीप (दादू) गोळे, अरविंद दंत व मिलिंद गोळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
चौकट
ऐतिहासिक संवर्धनासाठी प्रदक्षिणा ठरते प्रेरणादायी
सरसगडासारख्या ऐतिहासिक दुर्गांचा वारसा जतन करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे या प्रदक्षिणेतून अधोरेखित झाले. दुर्गांचा इतिहास जाणून घेण्याबरोबरच निसर्गसंवर्धन व तरुणांमध्ये स्वराज्याच्या इतिहासाविषयी अभिमान निर्माण करण्याचे काम या मोहिमेमुळे होत असल्याचे सहभागी दुर्गप्रेमींनी सांगितले. अशा उपक्रमांतून गडकोटांच्या जतनासाठी जनजागृतीला चालना मिळत आहे.
कोट
सरसगड हा केवळ एक किल्ला नसून तो आपल्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार आहे. अशा प्रदक्षिणांमुळे आजच्या तरुण पिढीला पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन प्रत्यक्ष गडकोटांचे वैभव आणि त्यामागचे दुर्गशास्त्र अनुभवता येते. शिवजयंतीच्या दिवशी अशा प्रकारे गडाला प्रदक्षिणा घालणे, हा छत्रपती शिवरायांना दिलेली एक अनोखी मानवंदनाच आहे. या मोहिमेसाठी संघर्ष समितीचे सदस्य आणि इतरही दुर्गप्रेमींनी मेहनत घेतली.
अमित निंबाळकर, आयोजक, पाली सुधागड संघर्ष संस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.