संकष्टी चतुर्थीला पालीत भक्तिसागर
बल्लाळेश्वर दर्शनासाठी पहाटेपासून रांगा
अन्नछत्र बंद असल्याने भाविकांचा हिरमोड
पाली, ता. ५ (वार्ताहर) : संकष्टी चतुर्थीनिमित्त रविवारी अष्टविनायक तीर्थक्षेत्र, पाली येथे भाविकांचा मोठा जनसागर उसळला. सुट्टीचा दिवस असल्याने राज्यासह देशभरातून भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण असून, श्री बल्लाळेश्वर मंदिर व गाभाऱ्याची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. तसेच देवाला सुंदर आभूषणे व वस्त्र परिधान करण्यात आले होते. मंदिराबाहेर रांगोळ्यांनीही परिसर खुलून दिसत होता.
भाविकांच्या मोठ्या गर्दीमुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. विविध वस्तूंनी सजलेली दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि रानमेवा, काजूगर, गावठी भाज्या विकणाऱ्या आदिवासी महिलांमुळे परिसर गजबजलेला दिसत होता. भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक हॉटेल व्यवसाय, किरकोळ दुकाने आणि इतर व्यावसायिकांना चांगला फायदा झाला.
मात्र व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळा आल्यामुळे अन्नछत्र (प्रसादालय) बंद ठेवावे लागले होते. त्यामुळे अनेक भाविकांची गैरसोय झाली. तरीही देवस्थान ट्रस्टच्या वतीने प्रसादाचे लाडू उपलब्ध करून देण्यात आले होते.
भाविकांची वाहने आणि इतर वाहतुकीमुळे पाली परिसरात काही ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तरीही भाविकांच्या उत्साहात कोणतीही कमी दिसून आली नाही.
कोट
सुट्टीचा दिवस असल्यामुळे संकष्टी चतुर्थीला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. भाविकांनी खरेदीही चांगली केल्याने आमचा व्यवसाय समाधानकारक झाला आहे.
- राहुल मराठे, व्यावसायिक, बल्लाळेश्वर मंदिर परिसर
कोट
भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेऊन योग्य नियोजन करण्यात आले. देवस्थान ट्रस्टच्या वतीने पिण्याच्या पाण्यासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रसादाचे लाडू उपलब्ध आहेत; मात्र गॅस सिलिंडरअभावी प्रसादालयात भोजन व्यवस्था सध्या सुरू करता आलेली नाही.
- जितेंद्र गद्रे, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.