पालीत पाण्याचा अपव्यय
मुख्य जलवाहिनीला गळतीमुळे हजारो लिटर पाणी रस्त्यावर
पाली, ता. १५ (वार्ताहर) ः एकीकडे पाणीकपात आणि दुसरीकडे प्रशासकीय दुर्लक्ष अशी संतापजनक परिस्थिती सध्या पाली शहरात पाहायला मिळत आहे. नगर पंचायतीकडून नागरिकांना पाणी वाचवा, पाणी जपून वापरा, असे आवाहन करत दर मंगळवारी शहरात पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे; मात्र दुसरीकडे याच नगर पंचायतीच्या मुख्य जलवाहिनीला पडलेल्या मोठ्या गळतीमुळे रोज हजारो लिटर शुद्ध पाणी अक्षरशः रस्त्यावर वाहून जात आहे. प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेमुळे पालीकरांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
पाली-खोपोली महामार्गावरील मिनीडोर स्टॅन्ड जवळील भाग्यश्री प्लाझा इमारतीच्या अगदी समोरील मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. नगर पंचायतीला पाणीपुरवठा करणाऱ्या या मुख्य वाहिनीमधून गेल्या अनेक दिवसांपासून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. रस्त्यावरून वाहणारे पाण्याचे लोट पाहून नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याशिवाय येथून चालणेदेखील मुश्कील होते.
येथील रहिवाशांनी सांगितले की, या जलवाहिनी गळतीबाबत नगर पंचायतीच्या संबंधित विभागाकडे वारंवार लेखी तक्रारी आणि तोंडी माहिती देण्यात आली आहे, मात्र त्यानंतरही प्रशासनाने या गंभीर बाबीकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. काही दिवसांपूर्वीच नगरपंचायतीने शहरात दर मंगळवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला आहे. भविष्यातील पाणीटंचाई रोखण्यासाठी आणि पाणी बचतीसाठी हा निर्णय घेतला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. कपात नागरिकांसाठी आणि पाण्याची नासाडी प्रशासनासाठी असा विरोधाभास आहे.
यासंदर्भात पाली नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष सुलतान बेनसेकर यांनी स्पष्ट केले की, या ठिकाणी यापूर्वीही वारंवार दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे, मात्र पाण्याच्या प्रचंड दाबामुळे तिथे पुन्हा गळती सुरू होते. नागरिकांची ही समस्या गांभीर्याने घेतली असून, सोमवारी (ता. १६) योग्य आणि कायमस्वरूपी तांत्रिक पद्धतीने ही दुरुस्ती करून पाणी गळती पूर्णपणे थांबवली जाईल.
आरोग्य धोक्यात
ही जलवाहिनी ज्या ठिकाणी फुटली आहे, त्या ठिकाणी गटारदेखील आहे. परिणामी, गटारातील घाणेरडे पाणी या पाण्यात मिसळून नळावटे पालीकरांच्या घरात जात आहे. त्यामुळे पालीकरांचे आरोग्यदेखील धोक्यात आले आहे.
फोटो ओळ,
पाली ः पाणीगळती होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.