महाड : महाड विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचाराला वेग आला असून मुंबई, ठाणे, पालघर परिसरात वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांच्या मतांकडे उमेदवारांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. आमदार भरत गोगावले यांनी मुंबईवासीयांसाठी नालासोपारा येथे, तर स्नेहल जगताप यांनी घाटकोपर येथे मेळावे आयोजित केले होते.
महाड व पोलादपूर तालुका, तसेच माणगाव तालुक्यातील काही भाग महाड मतदारसंघामध्ये येत असल्याने या भागातील अनेक मतदार व त्यांचे कुटुंबीय मुंबई, ठाणे व पालघर परिसरामध्ये वास्तव्यास आहेत, परंतु या मतदारांची मूळ गावे महाड मतदारसंघांमध्ये असल्याने त्यांची नावेही महाड येथील मतदार यादीत समाविष्ट आहेत. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये चाकरमान्यांची मते निर्णायक ठरत असतात. त्यामुळे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची प्रमुख भिस्त या चाकरमान्यांवर अवलंबून आहे.
यासाठी रविवार व सोमवारी (ता. २० व २१) दोन्ही गटाच्या शिवसेना उमेदवारांनी मुंबईमध्ये वास्तव्यास असलेल्या आपल्या मतदारांसाठी आपली भूमिका स्पष्ट करण्याकरिता वेगवेगळे मेळावे आयोजित केले होते.
ठाकरे गटाच्या महाड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार स्नेहल जगताप यांनी घाटकोपर येथे मुंबईवासीयांचा निर्धार मेळावा आयोजित केला होता. मेळाव्याला सुभाष देसाई, आमदार सचिन अहिर, कोकण समन्वयक विजय कदम, हनुमंत जगताप, रायगड महिला संघटक डॉ. स्वीटी गिरासे, तसेच मतदारसंघातील महाआघाडीच्या सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यामध्ये सुभाष देसाई यांनी छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीमध्ये रायगडला लागलेला गद्दारीचा कलंक स्नेहल जगताप यांना विजयी करून धुवून टाकण्याचे आवाहन मतदारांना केले, तर स्नेहल जगताप यांनी आमदारांनी तीन तालुक्यात केलेली ठोस कामे दाखवावी, असे आव्हान दिले.
आमदार भरत गोगावले यांनी ठाणे, पालघर परिसरामध्ये राहणाऱ्या मुंबईवासीयांचा मेळावा नालासोपारा येथे आयोजित केला होता. मेळाव्याला शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण चाळके, जिल्हाप्रमुख प्रमुख घोसाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत, एकनाथ सुकूम व इतर उपस्थित होते. या वेळी गोगावले यांनी साठ वर्षांत कोणी आणला नाही एवढा निधी आपण या मतदारसंघात आणल्याचे सांगत केलेल्या विकासकामाचे दीडशे पानाचे पुस्तकच काढणार असल्याचे प्रतिउत्तर विरोधकांना दिले.
शिवसेना ठाकरे गट व शिंदे गटाच्या दोन्ही उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने मुंबईवासीय मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी आपल्या वेगवेगळी भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे या वेळी चाकरमानी मुंबईकर कोणत्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणार, यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.