सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिका कार्यक्षेत्रातील दुकाने व आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरांत नामफलक लावणे बंधनकारक आहे. त्यासाठी २४ विभाग स्तरावर दुकाने व आस्थापना खात्यातील वरिष्ठ सुविधाकार व सुविधाकारांचे पथक गठित करण्यात आले आहेत. त्यांना कारवाईचे अधिकार देण्यात आले असून मंगळवारपासून (ता. २८) कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले आहे.
पालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी व्यापक बैठक घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश सर्व संबंधितांना दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी आणि उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईकरिता विभाग स्तरावर दुकाने व आस्थापना खात्यातील वरिष्ठ सुविधाकार व सुविधाकारांचे पथक गठित करण्यात आले आहे.
अशी होईल कारवाई
कारवाईदरम्यान ज्या दुकाने व आस्थापनांनी अधिनियमांची तरतूद व सर्वोच्च न्यायालयाचे आदेश यानुसार मराठी नामफलक मराठी देवनागरी लिपीत ठळक अक्षरांत लावले नसल्यास अशा दुकाने व आस्थापना मालकांवर अधिनियमातील तरतुदीनुसार न्यायालयीन कार्यवाही करण्यात येईल. ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल, असे पालिका प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
काय आहे विषय?
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमांच्या तरतुदींनुसार आस्थापनांचे नामफलक मराठी देवनागरी लिपीत ठळक अक्षरात असणे बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट याचिकेवरील सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांना दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी देवनागरी लिपीत ठळक अक्षरात लावण्याबाबत दोन महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत २५ नोव्हेंबरला संपुष्टात येत असून दुकाने व आस्थापनांवर अधिनियमातील तरतुदींनुसार मराठी देवनागरी लिपीत ठळक अक्षरात नामफलकांबाबतची कारवाई मंगळवारपासून (ता. २८) सुरू करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.