माहुलमध्ये कायमस्वरूपी रुग्णालय उभारणार
प्रसूतिगृह, दवाखान्याच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : माहुलमध्ये प्रसूतिगृह व दवाखाना सुरू करण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. यासाठी कायमस्वरूपी इमारत बांधण्यात येणार असून प्रस्तावित बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रदूषण आणि आरोग्याच्या समस्यांमुळे त्रासलेल्या माहुलकरांना यामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे.
चेंबूर खासकरून माहुल परिसरामध्ये वाढत्या प्रदूषणामुळे येथील नागरिकांना कर्करोग, क्षयरोग, अस्थमा, चर्मरोग, केसगळती यांसारख्या दुर्धर आजाराने अनेकांना ग्रासले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आजही हजारो रहिवासी दुर्धर आजाराने त्रस्त आहेत.
पालिकेने कायमस्वरूपी रुग्णालय उभारल्यास येथील रहिवाशांना आजाराचे निदान आणि उपचार करून घेण्यास मदत होणार असल्याची भावना येथील रहिवाशांची होती. पालिकेने कायमस्वरूपी दवाखाना उभारावा, अशी मागणी रहिवाशांनी केली होती. पालिकेने मोबाईल आरोग्य दवाखाना सुरू केला होता, मात्र रहिवासी संतुष्ट नव्हते.
एम/पश्चिम विभागातील माहुल गाव चेंबूर येथे प्रसूतिगृह आणि दवाखाना सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. प्रसूतिगृह आणि दवाखान्याचे आराखडे महानगरपालिका वास्तुशास्त्रज्ञ यांनी आवश्यकतेनुसार तयार केले आहेत. त्यास इमारत प्रस्ताव विभागाची मान्यतादेखील प्राप्त झाली आहे. मान्यताप्राप्त आराखड्यानुसार प्रस्तावित कामामध्ये तळमजला, चौथा मजला +पाचवा मजला (अंशतः) + एक उपयोगीता सेवा मजला असे बांधकाम करण्यात येणार आहे. मे. पेडणेकर अँड असोसिएट्स यांची स्थायी समितीने यापूर्वीच संरचनात्मक सल्लागार म्हणून नेमणूक केली असून त्यांनी सदर इमारतीचे संरचनात्मक आराखडे व अंदाजपत्रक तयार केले आहे.
सदर रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून अर्ज मागवले आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून मे. तिरुपती कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन यांची निविदा लघुत्तम ठरल्याने हे काम त्यांना देण्यात आले आहे. हे काम पावसाळ्यासहित २४ महिन्यांत पूर्ण करणे बंधनकारक असून पालिका यावर ३८ कोटी ४७ लाख ५० हजार ३३१ कोटी रुपये खर्च करत आहे.
रहिवाशांना आजारांची लागण
२०१९ पासून आजपर्यंत २५० हून अधिक लोकांनी आपले जीव गमावले आहेत. या परिसरात झोपडपट्टी परिसरही मोठ्या प्रमाणात असून रहिवाशांना पाण्याची समस्या सतावत आहे. बऱ्याच भागात दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या आजारांची लागण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.