मद्यपानाच्या सवयीमुळे स्वादुपिंड निकामी होण्याचा धोका
तरुण रुग्णांची संख्या वाढली; वेळीच उपचारांची गरज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मद्यपानाच्या सवयीमुळे तरुणांचे स्वादुपिंड निकामी होत आहे. वेळीच निदान व उपचार न झाल्यास अवयव निकामी होण्याचा धोका वाढला आहे. बाह्यरुग्ण विभागात दररोज भेट देणाऱ्या दोन ते तीन रुग्णांना अल्कोहोलच्या सेवनामुळे स्वादुपिंडास सूज आल्याची समस्या उद्भवते, असे एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
पचन व्यवस्थेचा महत्त्वाचा आणि छोट्या आतड्यांचा सुरुवातीचा भाग म्हणजेच स्वादुपिंड. वाढत्या व्यसनांमुळे हल्ली तरुणांमध्ये स्वादुपिंडाशी संबंधित विकारांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मद्यपानासारख्या वाईट सवयीमुळे २५ ते ३० वयोगटातील तरुणांमध्ये स्वादुपिंडासंबंधित आजारांमध्ये वाढ झाली आहे. अशा वेळी स्वादुपिंडाच्या आजाराचे वेळीच निदान आणि उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. उपचारास विलंब झाल्यास अवयव निकामी होण्यासह गंभीर गुंतागुंत होऊ शकते.
जनरल सर्जन डॉ. नरेंद्र निकम म्हणाले की, स्वादुपिंडाची सूज हा एक गंभीर आजार असून, तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. सर्वाधिक प्रकरणांमध्ये अति मद्यपान, पित्ताशयातील खडे, जास्त चरबीयुक्त आहार आणि काही ठरावीक औषधांचा वापर स्वादुपिंडाच्या आजारास आमंत्रण देते. लक्षणांमध्ये तीव्र पोटदुखी, मळमळ, उलट्या, ताप, जलद गतीने हृदयाचे ठोके वाढणे आणि पचन समस्यांचा समावेश आहे. काही प्रकरणांमध्ये मधुमेह, पोषण कमतरता आणि कायमस्वरूपी स्वादुपिंडाचे नुकसानदेखील होऊ शकते.
सावधगिरी बाळगा!
२५ ते ३० वयोगटातील तरुणांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, असे आवाहन जनरल आणि लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. हेमंत पटेल यांनी केले आहे. अल्कोहोलमुळे स्वादुपिंडात जळजळ होते, स्वादुपिंडास सूज येते, असे त्यांनी सांगितले. गरज पडल्यास रुग्णाला औषधोपचार, पोषक आहार आणि शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो, असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.