‘एआय’ करणार उमेदवारांच्या चेहऱ्याची ओळख
‘सीईटी’ सेलच्या मार्चमधील पहिल्या परीक्षेपासून सुरुवात
मुंबई, ता. ४ : राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सामायिक प्रवेश (सीईटी) परीक्षांना सामोरे जाणाऱ्या प्रत्येक उमेदवाराच्या चेहऱ्याची ओळख कृत्रिम बुद्धिमत्ता चाचणीच्या (एआय) माध्यमातून केली जाणार आहे. याची सुरुवात सीईटी सेलच्या १९ मार्च रोजी होणाऱ्या पहिल्या परीक्षेपासून होणार आहे. यासोबतच गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेला प्रवेशपत्र पडताळणीसाठी क्यूआर कोड स्कॅनिंगचा वापर केवळ नोंदणीकृत उमेदवारांनाच परीक्षा हॉलमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी केला जाणार आहे.
सीईटी परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकारांना रोखण्यासाठी सीईटी सेलने हे पाऊल उचलले असून, यामुळे सर्वच सीईटीच्या परीक्षा अत्यंत सुरक्षेच्या वातावरणात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, या परीक्षा प्रक्रियेत निष्पक्षता, पारदर्शकता राखण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाणार आहे. यातून गैरप्रकारांना रोखण्यास मदत मिळेल आणि त्यातून आलेल्या यशानंतर भविष्यात त्यांच्या अंमलबजावणीचा विचार केला जाईल, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली.
उच्च व तंत्रशिक्षण, कृषी, वैद्यकीय आदी अभ्यासक्रमांच्या विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सुमारे १९हून अधिक मुख्य अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये डमी उमेदवार बसविण्याचे काही प्रकार समोर आले होते. त्यामुळे आता येत्या परीक्षांमध्ये ‘एआय’च्या धर्तीवर सीईटी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रात येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराच्या चेहऱ्याची ओळख त्यांनी परीक्षा अर्ज भरताना दिलेल्या फोटोच्या आधारावर केली जाणार आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यापूर्वी उमेदवाराच्या चेहऱ्याची ओळख चाचणी घेतली जाईल. केंद्रावर घेतलेला फोटो सीईटी अर्ज प्रक्रियेदरम्यान सादर केलेल्या छायाचित्राशी किमान ८० टक्क्यांहून अधिक जुळला पाहिजे, शिवाय ही प्रतिमा सामान्य प्रवेश प्रक्रियेदरम्यान प्रदान केलेल्या छायाचित्राशीदेखील क्रॉस-व्हेरिफाय केली जाईल, ज्यामुळे संपूर्ण प्रवेश प्रक्रियेत सुसंगतता आणि सत्यता सुनिश्चित होईल, असे सीईटी सेलचे म्हणणे आहे.
..
परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे
चेहरा ओळखण्याव्यतिरिक्त सीईटी सेलने भौतिक आणि डिजिटल देखरेख यावरही भर दिला आहे. यात प्रत्येक परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, या माध्यमातून परीक्षा आणि तेथील सर्व हालचाली यांच्या नोंदी टिपल्या जातील. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यामातून सीईटी सेलमधील नियंत्रण कक्षातून प्रत्येक केंद्रावरील थेट प्रक्षेपणाचे रिअल-टाइममध्ये निरीक्षण केले जाईल. तसेच परीक्षा केंद्रांवर तैनात पर्यवेक्षकांना बॉडी कॅमेरेदेखील दिले जाणारा असून, त्यातून संपूर्ण परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांच्या वर्तन, हालचाली टिपल्या जातील आणि त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग तातडीने लक्षात घेतले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.