‘कोस्टल’वर जीवघेणी स्पर्धा
३,२६० जणांवर कारवाई; ध्वनिरोधक बसवण्याच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : कोस्टल रोडवर वेगाची जीवघेणी स्पर्धा सुरू असून वाहतूक पोलिसांनी आतापर्यंत मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहने चालवणाऱ्या ३,२६० जणांविरोधात कारवाई केली आहे. या मार्गावर भरधाव वेगात गाडी चालवणे, गाड्यांची स्पर्धा यामुळे रात्री आवाजाचा मोठा त्रास येथील रहिवाशांना सहन करावा लागत असून या मार्गावर ध्वनिरोधक (साउंड बॅरिअर) बसवावे, अशी सूचना वाहतूक पोलिसांनी पालिकेच्या रस्ते व वाहतूक विभागाला केली आहे.
कोस्टल रोड हा विनाअडथळा, विनासिग्नल असा मार्ग असून या मार्गावरून जाणाऱ्या गाड्या अनेकदा वेगमर्यादा ओलांडतात. या मार्गावर ताशी ६० ते ८० किमी वेगमर्यादा अपेक्षित असून काही वेळ यापेक्षा अधिक वेगाने वाहने चालवली जातात. त्यामुळे अपघातही होण्याची शक्यता असते. तसेच कोस्टल रोडवर रात्री मोटारगाड्यांची स्पर्धाही सुरू असतो. रात्री १० ते १२ या वेळेत श्रीमंतांच्या महागड्या गाड्या, मोठा आवाज करणाऱ्या स्पोर्ट्स कार यांची स्पर्धा व त्यामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी वाहतूक पोलिस व मुंबई महापालिका प्रशासनाकडे केल्या होत्या. रात्री दहानंतर या मार्गावर भरधाव वेगात गाड्यांची स्पर्धा लावण्यात येते. त्यात बहुसंख्य श्रीमंतांचा समावेश असतो, असा आरोप येथील नागरिकांनी केला होता. या परिसरातील रहिवाशांनीही डिसेंबर महिन्यात वाहतूक पोलिसांना पत्र लिहिले होते. अशा भरधाव वेगात धावणाऱ्या गाड्या आणि गाड्यांच्या स्पर्धांना आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाने वाहतूक पोलिसांकडेही मदत मागितली होती. तसेच दिवसाही या मार्गावर गाड्या वेगात धावतात, त्यामुळे अपघात होतात. डिसेंबर महिन्यात एक अपघात झाला होता. या अपघातात कंत्राटदाराचा एक कर्मचारीही मृत्युमुखी पडला होता. गेल्या आठवड्यात या मार्गावर अत्यंत वेगात धावणारी एक बीएमडब्ल्यू गाडी दुभाजकावर आदळली होती. वेगवान गाड्यांचा हा त्रास अद्यापही सुरूच आहे.
...
अपघात टाळण्यासाठी उपाय
‘कोस्टल’वरील अपघाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाने तंत्रज्ञानाबरोबरच पोलिसांचीही मदत घेण्याचे ठरवले. ताडदेव वाहतूक हद्दीतील मार्गावर मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहने चालवणाऱ्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, तसेच हायवे पोलिस यांच्या स्पीड गन वाहनांच्या मदतीने कारवाई केली जात आहे. आतापर्यंत मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या ३,२६० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.