अंधेरीत धुरामुळे
गुदमरून महिलेचा मृत्यू
लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील इमारतीत आग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : अंधेरी पश्चिम लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील आठ मजली ब्रॉक लँड बिल्डिंगला शनिवारी पहाटेच्या सुमारास सर्वजण गाढ झोपेत असताना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीमुळे पसरलेल्या धुराने गदमरून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. अभिना वालिया (वय ३४) असे मृत महिलेचे नाव आहे. गुदमरलेल्या सहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोन लहान मुलांचा समावेश आहे.
शुक्रवारी पहाटे २.३०च्या सुमारास अचानक लागलेल्या आग आणि धुरामुळे घाबरलेल्या रहिवाशांनी आरडाओरड करून मदतीसाठी याचना केली. धुरामुळे काहीच दिसत नव्हते, तसेच अनेक जण गुदमरले. धुरामुळे अभिना बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात नेण्यात आले; मात्र त्यांना दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, या आगीत विजेच्या तारा, विद्युत उपकरणे, स्प्लिट एसी युनिट, विंडो एसी युनिट, लाकडी फर्निचर, फाइल्स, कागदपत्रे, गाद्या, कपडे, घरगुती साहित्याचे नुकसान झाले. ही आग ग्राउंड प्लस आठ मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक १०४ मध्ये लागली. आगीमुळे संपूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरल्याने लोकांना श्वास घेण्यास त्रास झाला. अडीच तासांनंतर पहाटे पाच वाजता आग पूर्णपणे विझवण्यात यश आले. आगीच्या घटनेची अधिक चौकशी स्थानिक पोलिस, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून केली जात असल्याचे सांगण्यात आले.
----
चार जणांवर अतिदक्षता विभागात उपचार
अपर्णा गुप्ता (वय ४१), दया गुप्ता (२१), रिहान गुप्ता (३) आणि प्रद्युम्ना (१० दिवस) तसेच कार्तिक वालिया (४०) आणि पोलम गुप्ता (४०) अशी गुदमरलेल्यांची नावे असून त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. कार्तिक वालिया यांच्यावर कूपर रुग्णालयात, पोलम गुप्ता यांच्यावर ट्रॉमा सेंटरमध्ये, तर दोन मुलांवर कोकिलाबेन रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.