मेट्रोतील जाहिराती, जागेच्या भाड्याने महसुलात वाढ!
एमएमआरडीएला ‘नॉन-फेअर रेव्हेन्यू’अंतर्गत १२२ कोटींचे उत्पन्न
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : एमएमआरडीएकडून चालवल्या जात असलेल्या अंधेरी-दहिसर आणि दहिसर-गुंदवली या मेट्रो मार्गावरील जाहिराती, भाड्याने दिलेली जागा, ऑप्टिकल फायबर केबल शुल्क, मेट्रोमधील ब्रँडिंग अशा वेगवेगळ्या तिकीट भाड्याशिवायच्या (नॉन-फेअर रिव्हेन्यू) उत्पन्नाने एमएमआरडीएचा खिसा गरम झाला आहे.
२०२४-२५ या आर्थिक वर्षात एमएमआरडीएला तब्बल १२२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, मागील वर्षाचा विचार करता तिपटीने वाढ नोंदली गेली आहे. या नॉन-फेअर रिव्हेन्यूमधून मिळालेल्या अतिरिक्त उत्पन्नामुळे एमएमआरडीएचे मेट्रोच्या माध्यमातून मिळणारे वार्षिक उत्पन्न थेट २९२ कोटी रुपयांवर गेले आहे.
एमएमआरडीएची उपकंपनी असलेल्या महामुंबई मेट्रोकडून अंधेरी-दहिसर (मेट्रो २-अ) तर दहिसर-गुंदवली (मेट्रो ७) या एलिव्हेटेड मार्गावर वातानुकूलित मेट्रोचे संचालन करते. त्यानुसार प्रवासी वाहतुकीतून एमएमआरडीएला १७० कोटी रुपये महसूल मिळाला आहे. दरम्यान, एमएमआरडीएने प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाशिवाय इतर वेगवेगळ्या मार्गांनी उत्पन्न मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला मोठे यश आले असून, ऑप्टिकल फायबर केबल परवाना शुल्क, स्थानक आणि मेट्रोतील जाहिराती, ब्रँडिंग, स्थानकातील जागा भाड्याने देणे, चित्रीकरण अशा मार्गाने तब्बल १२२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. मागील वर्षी याचा मार्गाने केवळ ४२.५ कोटी रुपये एवढे उत्पन्न मिळाले होते. या विक्रमी वाढीमुळे एमएमआरडीएने स्वयंपूर्ण, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि प्रवाशांना सुलभ सेवा देणारी मेट्रो व्यवस्था उभारण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे.
या मार्गाने मिळाले उत्पन्न
- ऑप्टिकल फायबर केबल (ओएफसी) परवाना शुल्क - ६१.७२ कोटी रुपये
- स्थानकांवरील जाहिराती - २३.९५ कोटी रुपये
- गाड्यांवरील जाहिराती - ७.४७ कोटी रुपये
- खासगी रिटेल आऊटलेट्स आणि किऑस्क - ८.२२ कोटी रुपये
- स्थानक नामकरण व ब्रँडिंग अधिकार - ९.७६ कोटी रुपये
- कर्मचाऱ्यांचे कार्यक्षम व्यवस्थापन - ५.४३ कोटी रुपये
- टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर उत्पन्न - ४.५२ कोटी रुपये
- चित्रीकरणाची परवानगी, स्मॉल सेल, प्रमोशन्स - ६५ लाख रुपये
या माध्यमातून उत्पन्न वाढवण्यासाठी चाचपणी
- मेट्रो मार्गाच्या खांबावरील जाहिरातीचे हक्क
- ३० स्थानकांवर रिटेल आणि खानपान सेवेसाठी असलेल्या ७३ हजार चौरस फूट जागेचा जास्तीत जास्त उपयोग करणे
- चित्रीकरणासाठीचे भाडे
- कार्यक्रमआधारित ब्रँडिंग व प्रमोशनल ॲक्टिव्हिटी राबवणे
एक उत्तम प्रकारे आखलेल्या नॉन-फेअर बॉक्स रेव्हेन्यू धोरणामुळे महसुलातील हे उल्लेखनीय लक्ष्य साध्य करणे शक्य झाले. मेट्रोचे भाडे लोकांसाठी परवडणारे ठेवूनही आम्ही २०० कोटी रुपये उत्पन्नाचे लक्ष्य पार करून २९२ कोटीपर्यंत उत्पन्न वाढवू शकलो.
- डॉ. संजय मुखर्जी, आयुक्त, एमएमआरडीए
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.