अकरावी ऑनलाइन प्रवेश अनेक वर्षे ऑडिटविना!
आदेशांना फासला हरताळ
संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रकियेचे प्रत्येक वर्षी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑडिट करणे बंधनकारक असताना मागील अनेक वर्षांत एकदाही ते झाले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे या प्रवेश प्रक्रियेत न्यायालयाने दिलेल्या आदेशाचाही आणि विभागाने काढलेल्या आदेशालाही हरताळ फासला जात असल्याचे दिसून आले आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेत विविध राखीव गटातील आरक्षण तसेच अपंग, प्रकल्पग्रस्त आदी राखीव कोट्यासह अल्पसंख्याक, व्यवस्थापन आणि इनहाउस कोट्यातील प्रवेश त्या कोट्यानुसारच केले जातात का, याचे ऑडिट त्याचवर्षी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर करण्याचे आदेश न्यायालयाने २०१५मध्ये दिले होते. त्यानुसार ऑडिटसाठी २८ मार्च २०१६ जीआर काढण्यात आला. त्यातील मुद्दा क्रमांक १८ प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचे ऑडिट स्वतंत्र संस्थेमार्फत करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आलेले होते; मात्र आजतागायत त्या जीआरनुसार एकदाही अकरावीच्या प्रवेशाचे ऑडिट झाले नाही. यामुळे या प्रवेश प्रक्रियेत विविध राखीव गटातील विद्यार्थ्यांच्या हक्कांचे प्रवेश, कोट्यातील प्रवेश याची अनागोंदी विभागाकडून विभागाने समोर आणली नसल्याचे सिस्कॉम संस्थेने पुराव्यानिशी समोर आणले आहे. यामुळे सर्वंकष ऑडिट केले तर प्रवेश प्रक्रियेतील संस्थास्तरावरील प्रचंड गैरप्रकार समोर येतील आणि गुणवत्ता डावलून केलेल्या प्रवेशाचे सर्व वास्तव समोर येईल, अशी माहिती सिस्कॉमचे शिक्षणतज्ज्ञ राजेंद्र धारणकर यांनी दिली. आम्ही अपंग कोट्यातून इतर विद्यार्थ्यांच्या झालेल्या प्रवेशांचे अनेक पुरावे दिल्यानंतरही त्यावर अजूनही कारवाई झाली नसल्याचेही धारणकर म्हणाले.
...
तुकड्यांची तपासणीच नाही!
शाळा-कॉलेजांची नोंदणी करून घेतली जाते, ती शाळा, कॉलेज अधिकृत आहेत किंवा नाही, याची साधी तपासणीही केली जात नाही. मुंबई-पुण्यातील अनेक नामांकित महाविद्यालयांमध्ये मागील काही वर्षांपासून अनेक तुकड्या बेकायदा असतानाही त्यांना दरवर्षी प्रवेशासाठी मुभा दिली जाते. यंदाही पुणे-मुंबईत अशा असंख्य बेकायदा सुरू असलेल्या तुकड्यांमध्ये प्रवेश सुरू आहेत, असेही सिस्कॉमने सांगितले.
...
प्रवेश-परीक्षेतील तफावत
शाळा-कॉलेजांची व्हॅलिडीटी, त्यांची विद्यार्थी संख्या, त्यांना असलेल्या मान्यतेची तपासणी केली जात नाही. अकरावीला प्रवेश देताना आणि बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वेगळी असते. तरीही याची एकदाही तपासणी होत नाही. अकरावीत बोगस तुकडीत प्रवेश मिळालेले विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला आल्यानंतर त्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढते, तरीही त्यांची तपासणी होत नाही.
...
एकदाच केलेले सॉफ्टवेअर ऑडिट अपूर्ण
एकदाच सॉफ्टवेअरचे ऑडिट केपीएमजी कंपनीने करून त्यावर बोळवण करण्यात आली. त्यासाठी सुमारे दीड कोटींचा खर्च करण्यात आला, तेही ऑडिट केवळ एकाच वर्षाचे होते; परंतु त्यात फक्त सॉफ्टवेअरचे ऑडिट झाले, प्रवेशांचे नाही. यामुळे ते अपूर्णच होते, असे सिस्कॉमचे म्हणणे आहे. शिवाय, जे ऑडिट करण्यात आले ते आजही जाहीर करण्यात आले नाही, त्याची माहितीही दिली जात नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.