कामाठीपुरा पुनर्विकासाचे घोडे अखेर गंगेत न्हाणार!
म्हाडाकडून विकसकाच्या नियुक्तीसाठी निविदा प्रसिद्ध; ५०० चौरस फुटांच्या घराचे स्वप्न मार्गी लागणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : कामाठीपुरा पुनर्विकासाचे घोडे अखेर गंगेत न्हाणार असल्याचे निश्चित झाले आहे. या वसाहतीच्या पुनर्विकासासाठी नियोजन प्राधिकरण कोण, याबाबत म्हाडा आणि मुंबई महापालिकेदरम्यान सुरू असलेली रस्सीखेच कायम असतानाच राज्य सरकारचा ग्रीन सिग्नल मिळाल्याने म्हाडाने कामाठीपुराचा एकत्रित पुनर्विकास करण्यासाठी बांधकाम आणि विकास संस्थेची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे कामाठीपुराचा पुनर्विकास मार्गी लागणार असल्याचे स्पष्ट झाले असून, येथील मोडकळीस आलेल्या घरांत राहणाऱ्या साडेसात हजार भाडेकरू, रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर मिळू शकणार आहे.
कामाठीपुरा हा सुमारे ३४ एकर जागेवर वसला असून, तेथे ७७१ जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. त्यामुळे म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ या इमारतींचा विकास खासगी विकसकाच्या माध्यमातून करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार रहिवाशांना, भाडेकरूंना ५०० चौरस फुटांची सदनिका दिली जाणार असून, जागामालकाला प्रति ५० चौरस मीटर जागेसाठी ५०० चौरस फुटांची एक सदनिका मिळणार आहे. तसेच लोकसभा निवडणुकीआधी विकसक नियुक्तीसाठी निविदा काढण्याची तयारी केली होती. मात्र राज्य सरकारने या प्रकल्पासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून म्हाडाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली असतानाही सध्या नियोजन प्राधिकरण असलेल्या मुंबई महापालिकेकडून त्याला विरोध केला होता. परिणामी मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतरही नगरविकास विभागाने त्याबाबतचे आदेश न काढल्याने कामाठीपुराच्या पुनर्विकासाचे घोडे अडले होते.
रहिवाशांकडून पुनर्विकासासाठी वाढलेल्या दबावाची दाखल घेत राज्य सरकारने विकसक नियुक्तीसाठी निविदा प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आज म्हाडाने बांधकाम आणि विकास संस्थेच्या नियुक्तीसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे.
२८ जुलैपर्यंत निविदा भरता येणार
कामाठीपुराच्या पुनर्विकासासाठी प्रसिद्ध केलेल्या निविदेनुसार पात्र बांधकाम आणि विकास संस्थेला २८ जुलैपर्यंत निविदा भरता येणार आहेत. त्यामुळे कामठीपुराच्या पुनर्विकासासाठी कोण विकसक पुढे येणार, कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
असे आहे नियोजन
आठ एकर जागेत पुनर्वसन इमारती, रस्ते, गार्डन
कामाठीपुराचा भूखंड जवळपास ३४ एकरांचा असणार आहे. त्यामध्ये आठ एकर जागेवर पुनर्वसन इमारती उभारण्याचे नियोजन आहे. तसेच आठ एकर जागेवर रस्ते, गार्डन, खेळाचे मैदान अशा पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी जवळपास १४-१५ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
५३ मजली टॉवर, नऊ हजार सदनिका
कामाठीपुरा पुनर्विकासाअंतर्गत येथे तब्बल ५३ मजली गगनचुंबी टाॅवर उभा राहणार आहे. त्याबाबतचा प्राथमिक आराखडा तयार झाला असून, एकूण नऊ हजार सदनिका तयार होणार आहेत. त्यापैकी साडेसात-आठ हजार सदनिका रहिवासी आणि जागा मालकांसाठी असणार आहेत. तर म्हाडाला जवळपास ९००-१,००० हजार घरे उपलब्ध होऊ शकणार आहेत.
रहिवाशांना २५ हजार रुपये भाडे
कामाठीपुराच्या पुनर्विकास प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी येथील इमारती तोडाव्या लागणार आहेत. त्यासाठी रहिवाशांना घरे रिकामी करावी लागणार आहेत. मात्र सर्व साडेसात हजार रहिवाशांसाठी आवश्यक संक्रमण शिबिरे उपलब्ध होणे शक्य नाही. त्यामुळे संबंधितांना विकसकाच्या माध्यमातून बीडीडी चाळकऱ्यांप्रमाणेच २५ हजार रुपये भाडे देण्याचा पर्याय दिला जाणार आहे.
उशिरा का होईना पण कामाठीपुराच्या पुनर्विकासाच्या दिशेने सरकारने आणि म्हाडाने पाऊल टाकले आहे. आमच्यासाठी ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. भविष्यात घरे लवकर मिळावीत एवढीच अपेक्षा आहे.
- सुनील कदम, कार्याध्यक्ष, कामाठीपुरा विकास समिती
लोकसभा निवडणुकीपूर्वीच कामाठीपुराच्या पुनर्विकासासाठी म्हाडाकडून निविदा प्रसिद्ध केली जणार होती. मात्र काही कारणास्तव विलंब झाला असला तरी आता सुरुवात झाली आहे. कोणाचीही विकसक म्हणून नियुक्ती करावी, पण आम्हाला हक्काचे घर वेळेत द्यावे.
- कृष्णा कांबळे, रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते
कामाठीपुराचा पुनर्विकास व्हावा, यासाठी आम्ही गेल्या १२ वर्षांपासून प्रयत्नशील आहोत. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, कामाठीपुरा विकास समिती आणि रहिवाशांनी पाठपुरावा केला असून, त्याला अखेर यश आले आहे. आता पुनर्विकास वेळेत मार्गी लावून म्हाडाने, सरकारने आम्हाला न्याय द्यावा.
- सचिन करपे, अध्यक्ष, कामाठीपुरा गणेशोत्सव मंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.