गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा
रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे तिकिटांचे आरक्षण मोठी डोकेदुखी ठरत आहे. सध्या उपलब्ध असलेली आरक्षण प्रणाली प्रवाशांच्या सोयीऐवजी अडचणी निर्माण करत असल्याने, टप्प्याटप्प्याने (४५, ३० आणि १५ दिवस आधी) अॅडव्हान्स रिझर्व्हेशन कालावधी (एआरपी) सुरू करण्याची मागणी चाकरमान्यांच्या संघटनांकडून होत आहे.
अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, ‘‘सध्या एकाच वेळी अप आणि डाऊन मार्गासाठी आरक्षण सुरू केल्यामुळे प्रवाशांचे संपूर्ण प्रवासाचे नियोजन होणे कठीण होते. काही मिनिटांतच गाड्यांची तिकिटे संपतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात टप्प्याटप्प्याने आरक्षण सुरू केल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.’’
सध्या गणपतीसाठी जाहीर करण्यात आलेल्या विशेष गाड्यांची तिकिटे केव्हाच संपली असून, मुंबईतून कोकणात जाणाऱ्या हजारो प्रवाशांना पर्यायाचाच अभाव जाणवत आहे. प्रवाशांचा ओघ लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने प्रत्येक मार्गासाठी आरक्षण वेगवेगळ्या टप्प्यांत सुरू केल्यास अधिक चांगले नियोजन शक्य होईल, असे समितीचे मत आहे. एआरपी प्रणालीमध्ये काही अडचणी असल्यास, किमान अप आणि डाऊन मार्गांवरील आरक्षणासाठी स्वतंत्र तारखा निश्चित कराव्यात, अशीही सूचना प्रवासी संघटनांकडून करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना त्यांच्या दोन्ही दिशेच्या प्रवासासाठी आरक्षण घेणे सोपे जाईल.
...
गैरवापरालाही आळा बसेल!
गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपलेला असताना, लाखो चाकरमान्यांच्या प्रवासाचे नियोजन नीट पार पडावे यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी सांगितले की, टप्प्याटप्प्याने आरक्षण सुरू केल्यास तत्काळ कोट्यावरचा ताण कमी होईल. शिवाय बुकिंग सिस्टीममधील गोंधळ टळेल आणि गैरवापरालाही आळा बसेल.