म्हाडाला लागणार घरांची ‘लाॅटरी’
एकत्रित पुनर्विकासातून मिळणार १२ हजारांहून अधिक घरे; सामान्यांच्या गृहस्वप्नाला बळ
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ ः सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाला मुंबईत घरांची बंपर लाॅटरी लागणार आहे. मोतीलालनगर, जीटीबीनगर, कामाठीपुरा, अभ्युदयनगर, आदर्शनगर वरळी, वांद्रे रिक्लेमेशन अशा वेगवेगळ्या वसाहतींचा म्हाडा बांधकाम आणि विकास संस्था (कन्स्ट्रक्शन ॲण्ड डेव्हलपमेंट एजन्सी) नेमून पुनर्विकास करणार आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना पुढील चार-पाच वर्षांत प्रशस्त घरे मिळणार असून म्हाडालाही जवळपास १०-१२ हजार घरांचा साठा उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नपूर्तीला आणखी बळ मिळणार आहे.
म्हाडाच्या जागेवर असलेल्या वसाहतींचा किंवा उपकरप्राप्त इमारती असलेल्या कामाठीपुरा आणि जीटीबीनगर येथील सिंधी निर्वासितांच्या वसाहतीचा एकत्रित पुनर्विकास करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानुसार म्हाडाने मोतीलालनगर, जीटीबीनगरातील सिंधी वसाहतीच्या पुनर्विकासासाठी बांधकाम आणि विकास एजन्सीची नेमणूक केली आहे. तसेच कामाठीपुरा, अभ्युदयनगरच्या पुनर्विकासासाठी एजन्सीची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. दरम्यान, या पुनर्विकासातून येथील रहिवाशांना प्रशस्त आणि सुसज्ज सदनिका मिळणार आहेत. त्याशिवाय म्हाडाला हाउसिंग स्टाॅकच्या रूपाने घरांचा साठा मिळू शकणार आहे. ही घरे पुढील पाच-सात वर्षांत तयार स्वरूपात मिळणार असल्याने भविष्यात म्हाडाला जास्त घरांची लाॅटरी काढणे शक्य होणार आहे.
अल्प, मध्यम उत्पन्न गटासाठीच्या घरांवर भर
म्हाडाला पुढील काळात एकत्रित पुनर्वकासातून मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध होणार आहेत. त्यामध्ये जास्तीत जास्त घरे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी असावीत, असे निर्देश म्हाडा बांधकाम आणि विकास एजन्सीला दिले जाणर आहेत. त्याचबरोबर या घरांची लाॅटरीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
कुठे किती घरे मिळणार?
मोतीलालनगर
- गोरेगाव पश्चिम येथील मोतीलालनगर १, २ व ३ या म्हाडा वसाहतीचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडाने बांधकाम आणि विकास संस्था म्हणून अदाणी समूहाच्या कंपनीची नियुक्ती केली आहे.
- त्यानुसार येथील ३,७०० रहिवाशांना १,६०० चौरस फुटाच्या अत्याधुनिक सदनिका मिळणार आहेत.
- म्हाडाला तीन लाख ९७ हजार १०० चौरस मीटर क्षेत्र विकसकाकडून बांधून मिळणार आहे. त्या माध्यमातून सुमारे सात-आठ हजार घरे उपलब्ध होऊ शकणार आहेत.
जीटीबीनगर
- गुरू तेग बहादूरनगर (जीटीबीनगर) येथे सुमारे ११.२० एकर जागेवर सिंधी निर्वासितांच्या वहासतीचा म्हाडाच्या माध्यमातून पुनर्विकास केला जाणार असून त्यासाठी किस्टोन रियलेटर्सची नियुक्ती केली आहे.
- या पुनर्विकासातून येथील १,२०० रहिवाशांना ६३५ चौरस फुटांचे घर मिळणार आहे.
- म्हाडाला २५ हजार ७०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा गृहसाठा उपलब्ध होणार असून त्या माध्यमातून ७००-८०० घरे निर्माण होऊ शकणार आहेत.
कामाठीपुरा
- कामाठीपुराचा एकत्रित पुनर्विकास करण्यासाठी म्हाडाने बांधकाम आणि विकास संस्थेची (सी अँड डीए) नियुक्ती करण्याकरिता निविदा प्रसिद्ध केली आहे.
- राज्य सरकारने दिलेल्या मंजुरीनुसार येथील आठ हजार भाडेकरू-रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर मिळू शकणार आहे.
- ८०० जागा मालकांना प्रति ५० चौरस मीटर जागेकरिता ५०० चौरस फुटाची एक सदनिका मिळणार आहे.
- म्हाडाला जवळपास ४४ हजार चौरस मीटरचे बांधीव क्षेत्रफळ उपलब्ध होऊ शकणार आहे. १,०००-१,२०० सदनिका तयार होऊ शकतील.
वांद्रे रिक्लेमेशन, आदर्शनगर वरळी
- म्हाडाच्या वांद्रे रिक्लेमेशन, वरळी आदर्शनगर येथील इमारतींचा एकत्रित पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानुसार बांधकाम आणि विकास संस्थेची नियुक्ती करून त्याचा पुनर्विकास केला जाणार आहे. या दोन्ही ठिकाणांहून म्हाडाला जवळपास १,०००-१,५०० घरे मिळू शकणार आहेत.
अभुदयनगर
- काळाचौकी येथील अभुदयनगरचा म्हाडा बांधकाम आणि विकास संस्था नेमून पुनर्विकास करणार आहे. त्या माध्यमातून म्हाडाला सुमारे ५००-६०० सदनिका उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
--------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.