सुरतच्या बाप्पामुळे मुंबईत वाहतूक खोळंबा
पोलिसांना डोकेदुखी; नागरिकांना त्रास
मुंबई, ता. २५ ः गुजरातमधील सुरतच्या एका सार्वजनिक मंडळाने परळ येथील चित्रशाळेत बनवून घेतलेल्या गणेशमूर्तीची माटुंग्यापर्यंत वाजतगाजत मिरवणूक काढल्यानंतर शहरातील अन्य मंडळांनी तसा हट्ट धरला आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांची डोकेदुखी आणि नागरिकांच्या मनस्तापात भर पडते आहे.
परळ येथे भारतमाता चित्रपटगृह आणि सिगारेट फॅक्टरीजवळ दोन मोठ्या चित्रशाळा असून तेथील मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्ती मुंबई महानगर प्रदेशासह परराज्यात नेल्या जातात. गेल्या दोन आठवड्यांतील शनिवार आणि रविवारी अनेक मंडळांनी येथून आपापल्या विभागांत मूर्ती नेली. यात एक मंडळ खास सुरतहून आले होते. चित्रशाळेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर मूर्ती आणताच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक सुरू केली. त्यामुळे शहरातील या महत्त्वाच्या रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाला. भोईवाडा पोलिस आणि वाहतूक पोलिस तेथे पोहोचले. मिरवणूक काढण्याआधी परवानगी आवश्यक आहे आणि अनेक मंडळांना या मार्गावर मिरवणुकीस परवानगी नाकारण्यात आल्याचे पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र कार्यकर्त्यांनी त्यास भीक घातली नाही. उलट काही वलयांकित व्यक्तींकरवी पोलिसांवर मिरवणूक सुरू ठेवण्यासाठी दबाव आणल्याची चर्चा आहे. त्यानंतर या मंडळाने परळ ते माटुंगा यादरम्यान मिरवणूक काढली. ती झरझर पुढे सरकावी या उद्देशाने पोलिसांनी कार्यकर्त्यांना मूर्ती ट्रकवर चढविण्यास सांगितली; मात्र ती सूचना कार्यकर्त्यांनी अमान्य केली. त्यामुळे मिरवणूक लांबली आणि त्याचा फटका रहदारीला बसला.
...
इतर मंडळांचा हट्ट
सुरतच्या मंडळाने मिरवणूक काढल्यानंतर अन्य सार्वजनिक मंडळांनीही मिरवणुकीसाठी हट्ट धरला. दररोज अनेक मंडळे मिरवणुकीच्या परवानगीसाठी पोलिस ठाण्यात येत आहेत.
...
कुटुंबाचे विमान हुकले
आधीच्या रविवारीही या दोन्ही चित्रशाळांजवळील रस्त्यावर शहरातील सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांची वाहने, मूर्तीची मिरवणूक यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे परदेशी जाणाऱ्या सात प्रवाशांचे विमान हुकले, अशी माहिती भोईवाडा पोलिसांना मिळाली.
...
रुग्णांचा खोळंबा
जे.जे., के.ई.एम. आणि शीव येथील लोकमान्य टिळक ही तीन महत्त्वाची रुग्णालये या परिसरात आहेत. या चित्रशाळांसमोरील खोळंब्यात रुग्ण, अग्निशमन दलाची वाहने, पोलिस वाहनांसह घाईगडबडीत प्रवासाला निघालेल्या नागरिकांची वाहने त्यात फसू शकतात, अशी भीती पोलिसांना आहे.
...
भोईवाडा पोलिसांची सूचना
मंडळांनी चित्रशाळेतून गणेशमूर्ती घेतल्यावर ती सोबत आणलेल्या वाहनावर चढवावी, आपापल्या परिसरात जावे आणि मंडपाच्या जवळपास रहदारीला अडथळा होणार नाही, नागरिकांसह शासकीय यंत्रणांना अडचण होणार नाही, याची खबरदारी घेत पोलिस परवानगी मिळवून मिरवणूक काढावी.
...
आम्ही सर्व सार्वजनिक मंडळांना गणेशमूर्ती चित्रशाळेतून आपापल्या मंडपात नेण्यापासून विसर्जनापर्यंत रहदारीस अडचण न करता, नागरिक आणि पोलिसांना त्रास होईल, अशी कोणतीही कृती न करता हा उत्सव साजरा करण्याची सूचना केली आहे. शनिवारी (ता. २६) समन्वय समितीची बैठक होणार असून त्यात या सूचना पुन्हा दिल्या जातील.
- नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.