पगार १० हजार, हप्ता ८,३३३
स्नेहलनीती घोटाळा; ऐपत नसलेल्यांना कर्ज
मुंबई,. ता. १२ ः स्नेहलनीती घोटाळ्यात विद्यार्थी, बेरोजगार तरुणांसह ज्यांची हप्ते भरण्याची ऐपत नाही अशा असंख्य व्यक्तींना प्रक्रिया डावलून ५० हजार ते सव्वा लाख रुपयांचे कर्ज मिळवून देणाऱ्या बजाज फायनान्सच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना या गुन्ह्यात आरोपी करावे, कर्ज प्रक्रिया काटेकोर तपासावी, अशी मागणी फसवणूक झालेले गुंतवणूकदार करीत आहेत.
याबाबत बजाज फायनान्स कंपनीच्या प्रवक्त्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया विचारण्यात आली; मात्र प्रवक्त्याने प्रतिक्रिया दिली नाही. फसवणूक झाल्याची तक्रार देणाऱ्यांपैकी अनेकांना बजाज फायनान्सने कर्ज दिल्याची माहिती नवी मुंबईच्या एपीएमसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय उपाळे यांनी दिली. मार्च महिन्यात या पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यावर उपाळे आणि पथकाने या प्रकरणाचा तपास केला होता. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेच्या कक्ष-१कडे वर्ग झाले. तेथे विजय शिंगे यांनी पुढील तपास केला. मात्र शिंगे जुलै महिनाअखेर निवृत्त झाले. शिंगे यांनीही फसवणूक झालेल्या बहुतांश व्यक्तींनी बजाज फायनान्सकडून कर्ज घेतल्याचे स्पष्ट केले.
या प्रकरणातील मूळ तक्रारदार मानिनी वरळीकर (वाशी) आणि अन्य गुंतवणूकदारांच्या वतीने प्रकरणाचा पाठपुरावा करणारे संजय आयरे (मुलुंड) यांच्या दाव्यानुसार स्नेहल कांबळे यांच्या तुर्भे येथील कार्यालयात बजाज फायनान्सचे प्रतिनिधी आधीपासून उपस्थित असत. कोर्स किंवा फ्रँचायजी घेण्यास उत्सुक आलेल्यांना ही मंडळी अत्यंत घाईगडबडीत एका खोलीत नेत त्यांचा फोन हाती घेत अवघ्या काही सेकंदांत कर्ज मंजूर करून दिले होते. या प्रक्रियेआधी एकाकडूनही आवश्यक असलेली बँक स्टेटमेंट, आयकर परतावा, ॲड्रेस प्रूफ इत्यादी कोणतीही कागदपत्रे घेण्यात आली नव्हती. कर्ज मंजूर झालेल्या अनेकांचे सिबिल खराब होते. अनेक जण बेरोजगार होते. जे कामाला होते त्यांचा पगार १० ते १२ हजार इतका होता. त्यांना मंजूर झालेल्या कर्जावर महिन्याचा ८,३३३ रुपयांचा हप्ता भरावा लागणार होता.
कांबळेने पहिले तीन हप्ते कंपनीत भरेल. चौथ्या महिन्यात उर्वरित एक लाखाचे कर्ज १०० टक्के कमिशन म्हणून दिले जाईल, त्यामुळे कर्ज आपोआप चुकते होईल. पाचव्या महिन्यापासून पुढे फ्रँचायजीवर घरबसल्या २० टक्के साधारण ५० हजार ते एक लाख रुपये मिळतील, असे आश्वासन दिले होते. विशेष म्हणजे तसा करार कांबळेंच्या स्नेहलनीती कंपनी आणि फसवणूक झालेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत करण्यात आला होता, अशी माहितीही वरळीकर, आयरे यांनी दिली. या करारामुळे बजाज फायनान्सच्या कर्जाबाबत तेव्हा कोणाची तक्रार नव्हती. मात्र कांबळे पसार झाला, हप्ते थकले आणि बजाज फायनान्सतर्फे वसुलीसाठी धडपड सुरू झाली, तेव्हा मात्र ज्यांची ऐपत नव्हती किंवा तुटपुंजी कमाई होती त्यांना याची झळ सर्वाधिक बसली, असे या दोघांनी स्पष्ट केले.
...
मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात राहते. परिचित व्यक्तीमार्फत स्नेहलनीतीशी करारबद्ध झाले. सव्वा लाखाचे कर्ज मंजूर झाले तेव्हा मी बेरोजगार होते. घरची परिस्थिती हलाखीची होती. दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असताना महिन्याकाठी ८,३३३ रुपये हप्ता कसा, कुठून भरणार या विचाराने नैराश्य आले.
- रुचिरा तारी (सिंधुदुर्ग)
...
मी सटाण्यातील खासगी छापखान्यात हेल्पर म्हणून काम करतो. फेसबुकवर जाहिरात पाहून घरबसल्या पैसे कमावण्याच्या उद्देशाने मी स्नेहलनीती कंपनीसोबत जोडला गेलो. कर्ज प्रक्रिया सुरू होती तेव्हा मला १० हजार पगार असून, मी एकटा कमावता व्यक्ती असल्याचे स्पष्ट केले होते. मला ५६ हजर रुपयांचे कर्ज मंजूर झाले आणि त्याचा सात हजार रुपये हप्ता बसला.
- कमलाकर निकुंभ (नाशिक)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.