वानखेडे स्टेडियमच्या पुनर्बांधणीविरुद्धची याचिका फेटाळली
आवश्यक त्या सर्व परवानग्या घेतल्याचे निरीक्षण
मुंबई, ता. १५ : दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियम आणि गरवारे क्लब हाउसच्या पुनर्बांधणीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली.
वानखेडे स्टेडियमच्या पुनर्बांधणीचे काम सुरू होण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आल्याचे निरीक्षण मुख्य न्या. आलोक आराधे आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने नोंदवले. स्टेडियमच्या बांधकामामुळे पश्चिम रेल्वे मार्गाला कोणताही धोका निर्माण झाल्याचे दर्शविणारे कोणतेही पुरावे रेकॉर्डवर नाहीत. त्यातच पुनर्बांधणीचे काम पूर्ण झाले असून, काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्याचेही न्यायालयाने २००९मध्ये दाखल केलेली जनहित याचिका निकाली काढताना स्पष्ट केले.
प्रकरण काय?
पश्चिम रेल्वे मार्गाला लागूनच असलेल्या वानखेडे स्टेडियममुळे सुरक्षिततेच्या धोक्यांबद्दल तसेच स्टेडियमच्या पुनर्बांधणीदरम्यान पर्यावरण आणि नगररचना नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अमित मारू यांनी जनहित याचिकेतून केला होता. त्यामुळे स्डेडियमला परवानगी देणाऱ्या रेल्वे आणि पालिका अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची आणि स्टेडियमचा पुनर्बांधणी केलेला भाग पाडण्याची मागणीही केली होती. स्टेडियम उभारताना पर्यावरणीय मंजुरीसह सीआरझेड अटींचेही उल्लंघन केल्याचा दावा केला होता.
न्यायालयाचे निरीक्षण
महाराष्ट्र सागरीकिनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) आधीच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून प्रकल्पाची शिफारस केली होती, असे न्यायालयाने नमूद केले. वानखेडे स्टेडियम आणि गरवारे क्लब हाउस एका दशकाहून अधिककाळ कोणत्याही दुर्घटनेशिवाय किंवा सुरक्षिततेबाबत तक्रारींशिवाय कार्यरत आहे. तसेच याचिकेत कोणत्याही वैधानिक परवानग्यांना आव्हान दिले नव्हते. त्यामुळे कोणतेही कायदेशीर उल्लंघन झाल्याचे म्हणता येणार नाही, असेही न्यायालयाने याचिका निकाली काढताना नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.