मुंबईत वाढते आहे पावसाचे प्रमाण
यंदाही सरासरीपेक्षा अधिक; जनजीवन ठप्प होण्याच्या घटनांतही वाढ
मिलिंद तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : मुंबईत यंदाच्या मोसमात पावसाने सरासरीचा उच्चांक ओलांडला आहे. महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २८ ते २९ सप्टेंबर २०२५ दरम्यान शहरात सरासरी ७५ ते ११० मिमी पाऊस नोंदवला गेला, तर हंगामातील एकूण पावसाची वार्षिक सरासरीच्या तुलनेत १० ते ३० टक्क्यांनी अधिकची नोंद झाली आहे.
कुलाबा वेधशाळेच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत २,६३३.६ मिमी पाऊस झाला असून, तो वार्षिक सरासरीपेक्षा ८.७४ टक्के अधिक आहे, तर सांताक्रूझ वेधशाळेच्या आकडेवारीनुसार ३,०६८ मिमी पाऊस पडला असून, हा आकडा सरासरीपेक्षा तब्बल १८.५ टक्के जास्त आहे. म्हणजेच संपूर्ण मुंबईत २,७११.१० मिमी एकूण पाऊस पडला आहे. यामुळे मुंबईतील पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये पाणी तुंबणे आणि वाहतुकीत अडथळे निर्माण झाले होते. मुंबईत वाढत्या काँक्रीटीकरणामुळे पाण्याचा झिरपण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. रस्ते, गगनचुंबी इमारती आणि उभारलेल्या टॉवरच्या जंगलामुळे पाणी जमिनीत मुरत नाही. परिणामी हलक्याशा पावसातही साचलेले पाणी तासन्तास रेंगाळते. आता सरासरीपेक्षा अधिक पावसाने ही परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
...
महापुराचे परिणाम
सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे मुंबईकरांची वारंवार तारांबळ उडत आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कासवगतीने सुरू राहते. रेल्वेमार्गांवर गाड्यांचा वेग कमी होतो, तर पाण्याच्या निचऱ्याची योग्य सोय नसल्याने उपनगरांतील अनेक भाग पाण्यात बुडतात. यामुळे वारंवार वाहतूक कोंडी तर होतेच, शिवाय याचा व्यवसायावरदेखील परिणाम होतो. यामुळे मुंबईच्या आर्थिक विकासालादेखील खीळ बसते. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईची प्रतिमादेखील मलिन होत आहे.
...
वाढत्या पावसाचे धोके
तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत मुंबईसमोर काही मोठे धोके आहेत. जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारती कोसळण्याचा धोका सर्वाधिक आहे. तसेच काही डोंगराळ भागात भूस्खलनाची भीती आहे. पाणी तुंबत असल्याने पाण्यातून पसरणारे आजार जसे की लेप्टोस्पायरोसिस, डेंगी यांचा प्रसार वाढण्याचा धोकाही आहे. वाहतुकीत वारंवार खंड पडल्यास नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यावर प्रचंड परिणाम होणार आहे.
...
हजारो कोटींचा फटका
पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबण्याच्या घटनांची मोठी किंमत मुंबईला चुकवावी लागत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला पावसामुळे गेल्या १० वर्षांत १४ हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. अमेरिकेच्या युनायटेड स्टेटस् ट्रेंड अँड डेव्हलपमेंट एजन्सीने २००५ ते २०१५ या वर्षांच्या प्रसिद्ध केलेल्या अहवालात हे नमूद केले आहे. हा जुना अहवाल असला तरी यातून होणाऱ्या मोठ्या आर्थिक हानीची कल्पना येते.
...
मुसळधार पावसाच्या घटना
- यंदा २६ मे रोजी मुसळधार पाऊस झाला होता. या दिवशी मुंबईच्या कुलाबा वेधशाळेत २४ तासांत १३५.४ मिमी पाऊस नोंदवला गेला. नरिमन पॉइंट परिसरात (सकाळी ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान एका तासात) १०४ मिमी पाऊस झाला होता.
- मुंबईत १६ ते १८ ऑगस्टदरम्यान सलग पडलेल्या मुसळधार पावसाने बहुतांश भागांत पाणी तुंबले. त्यामुळे वाहतूक, दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. यादरम्यान ४०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला.
- २० ऑगस्टला अनेक भागांत मुसळधार पावसामुळे पाणी साचले, रस्ते तुंबले, रेल्वेसेवा प्रभावित झाली; ४०० लोकांना स्थलांतरित केले गेले. केवळ दीड दिवसात ४०९ मिमी पावसाची नोंद झाली.
...
मुंबईत काँक्रीटीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. खुल्या जमिनी फारशा उरलेल्या नाहीत. पर्यायाने पावसाचे पाणी जमिनीत न मुरता ते तुंबते. त्याची किंमत आपल्या सर्वांना चुकवावी लागते.
- झोरू भाथेना, पर्यावरणप्रेमी
...
संरक्षित जमिनींवर विकासाच्या नावावर भराव टाकला जात आहे किंवा बांधकामे केली जात आहेत. यामुळे पुराचे पाणी घरांमध्ये घुसण्याचे प्रमाण वाढले आहे. कमी पाऊस झाला तरी पाणी तुंबते. यामुळे आपण पर्यावरणासह लोकांचे जीवन धोक्यात घालत आहोत.
- डी. स्टॅलिन, संस्थापक, वनशक्ती संस्था
...
रस्ते आणि पूल बांधण्याचा आपण सपाटा लावला आहे; मात्र खुल्या जमिनींचा आपण विचारच करीत नाही. आता पार्किंगही इमारतींमध्ये उभारीत आहोत. यामुळे थोडा पाऊस झाला तरी रस्त्यांवर पाणी जमून वाहतूक कोलमडते. सार्वजनिक वाहतूक झपाट्याने कमी झाल्याने वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे. वाहतूक आणि पर्यावरणतज्ज्ञांना सोबत घेऊन सरकारने यावर तोडगा काढायला हवा.
- अशोक दातार, वाहतूकतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.