मुंबईतील रिक्षा, टॅक्सीचालकांना गणवेशाचा विसर
वाहतूक पोलिसांचा कारवाईचा बडगा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मोटार वाहन कायद्यानुसार रिक्षा व टॅक्सीचालकांना गणवेश अनिवार्य आहे, मात्र अनेकदा चालक गणवेश परिधान न करताच वाहने चालवितात. त्यांना गणवेशाचा विसर पडल्याचे चित्र आहे. अशा वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. वाहतूक पोलिसांच्या २०२४च्या अहवालानुसार ५० हजार अशा रिक्षा, टॅक्सीचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
वाहतूक पोलिसांकडून रिक्षा व टॅक्सीची तपासणी मोहीम सुरू असते. यात चालकांच्या गणवेशापासून ते अन्य कागदपत्रांचीदेखील तपासणी केली जाते. रिक्षा व टॅक्सीचालकांना पांढऱ्या रंगाचा शर्ट व खाकी रंगाची पॅन्ट असा गणवेश आहे. तसेच ओळखपत्र प्रदर्शित करणे अनिवार्य आहे. तपासणी मोहिमेत या बाबी प्रामुख्याने पाहिल्या जातात. यासह मीटर तपासणी, वाहनांची वैध कागदपत्रे हीदेखील पाहिली जातात. वाहतूक पोलिस रिक्षा व टॅक्सी तपासणी मोहीम नियमित सुरू आहे. कारवाई टाळण्यासाठी चालकांनी आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवावीत, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले.
काय आहे गणवेश?
रिक्षा व टॅक्सीचालकांना पांढऱ्या रंगाचा शर्ट व खाकी रंगाची पॅन्ट असा गणवेश आहे. तसेच ओळखपत्र प्रदर्शित करणे अनिवार्य आहे.
किती आहे दंड?
रिक्षा व टॅक्सीचालकांनी गणवेश परिधान न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते पहिल्या गुन्ह्यासाठी पाचशे रुपये दंड, तर दुसऱ्या होण्यासाठी दीड हजार रुपये दंड आकारण्यात येतो.
महाराष्ट्र मोटार वाहन कायद्यानुसार गणवेश परिधान करणे अनिवार्य आहे. मीटरने रिक्षा, टॅक्सी चालवणारे गणवेशाचे पालन करतात, परंतु विमानतळ, रेल्वेस्थानक या परिसरात चालक गणवेश परिधान करत नाहीत. त्यांच्यावर वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई करणे गरजेचे आहे.
– थंपी कुरियन, मुंबई रिक्षा मेन्स युनियनचे नेते
घाटकोपरमध्ये सर्वाधिक उल्लंघन
मुंबईत गणवेश परिधान न करण्याच्या ५०,७६१ प्रकरणे आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रकरणे घाटकोपर वाहतूक विभागात ७,९१४, तर सर्वात कमी ४७ प्रकरणे वडाळा वाहतूक विभागात आहेत.
जास्त कारवाई आकडेवारी (जानेवारी ते डिसेंबर २०२४)
विभाग - प्रकरणे
घाटकोपर - ७,९१४
दहिसर - ३,२९९
मुलुंड - २,०४०
चुनाभट्टी - २,०२७
विक्रोळी -२,०१८
===
कमी कारवाई
विभाग - केसेस
वडाळा - ४७
पायधुनी -२१६
कुलाबा - २३८
आझाद मैदान - ३६७
भोईवाडा- ३७९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.