कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील नांगुर्ले आदिवासी वाडीत लहान मुलांसाठी शिक्षण व पोषणाची नवी सोय उपलब्ध झाली आहे. प्रधानमंत्री जनमन योजना आणि ICDS अंतर्गत महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून मंजूर झालेली तालुक्यातील पहिली अंगणवाडी रविवारी (२ नोव्हेंबर) रोजी उद्घाटन करण्यात आली. हा लोकार्पण सोहळा रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या हस्ते पार पडला.
आदिवासी वस्तीमध्ये आतापर्यंत अंगणवाडीची सुविधा नसल्याने लहान मुले शिक्षणासोबत पोषण आहारापासूनही वंचित होती. हा विषय स्थानिकांनी माजी उपाध्यक्ष घारे यांच्या निदर्शनास आणताच त्यांनी पाठपुरावा करत ही सुविधा साकार करण्यास पुढाकार घेतला. कर्जत तालुक्यात मंजूर झालेल्या अंगणवाड्यांपैकी सर्वांत प्रथम पूर्ण झाली ती नांगुर्ले वाडीची अंगणवाडी ठरली आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र निगुडकर, कर्जत-खालापूर महिला संघटक पूजाताई सुर्वे, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र देशमुख, माजी सरपंच जयेंद्र देशमुख, सुरेश शिर्के, भरत कदम, अजय पवार, नंदकुमार धामणसे, पारस कदम, अविनाश म्हामले, अजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते. परिसरातील महिला आणि ग्रामस्थ या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
अंगणवाडीद्वारे ६ वर्षांखालील मुलांना पोषक आहार, आरोग्य तपासणी, लसीकरण आणि पूर्व प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध होणार आहे. तसेच गर्भवती व स्तनदा मातांसाठीही आरोग्य विषयक मदत आणि मार्गदर्शन मिळणार आहे. प्रधानमंत्री जनमन योजनेचा उद्देश विशेष मागास आदिवासी जमातींपर्यंत (PVTG) शासनाच्या सुविधा पोहोचवणे हा आहे. त्याच उद्देशाची पूर्तता या उपक्रमातून होत असल्याचे सांगण्यात आले. नांगुर्ले वाडीतील या अंगणवाडीच्या सुरूवातीमुळे मुलांच्या शिक्षणाचा पाया मजबूत होणार असून त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यास यातून नक्कीच हातभार लागेल, अशी सर्वांची भावना आहे.
“आदिवासी वस्तीतील प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण आणि पोषण पोहोचणे हे आमचे ध्येय आहे,” असे सुधाकर घारे यांनी यावेळी सांगितले. स्थानिक ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त करत भविष्यात आणखी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा मांडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.