मराठी माणसांसाठी ‘हे’ हक्काचे स्थान!
उपमुख्यमंत्री शिंदे यांचे घुमानमध्ये प्रतिपादन
मुंबई, ता. ६ : पंजाबमधील घुमान येथे होणारे संत नामदेव महाराष्ट्र सदन हे महाराष्ट्र आणि पंजाबच्या ऐतिहासिक संबंधांना दृढ करणारे ठरेल. घुमानला मोठ्या संख्येने भेट देणाऱ्या मराठी माणसांसाठी हे सदन हक्काचे स्थान असेल, अशी ग्वाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घुमान येथे झालेल्या सोहळ्यात दिली.
संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या ७५५व्या प्रकाशोत्सवाच्या औचित्याने संत नामदेवांनी जेथे आपल्या आयुष्यातला उत्तरार्ध व्यतीत केला त्या पंजाबमधील घुमान येथे संत नामदेव महाराष्ट्र सदनाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्याचबरोबर या कार्यक्रमात घुमानमधील नामदेव दरबार कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीने ‘बाबा नामदेव महाराज सन्मान पुरस्कार’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आला. पंजाब शासनाने सरहद संस्थेला दिलेल्या दोन एकर जागेत हे महाराष्ट्र सदन उभारण्यात येणार असून, महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायासाठी श्रद्धेचे ठिकाण असलेले घुमान हे गाव देशाच्या पर्यटन नकाशावर येण्यासाठी महाराष्ट्र शासन प्राधान्याने पुढाकार घेईल, अशी ग्वाही देतानाच घुमान येथील रस्ते आणि रेल्वे यासंदर्भात केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
‘सकाळी पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठलाची महापूजा केली. पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि संध्याकाळी भारत-पाकिस्तान सीमेलगत असलेल्या घुमानमध्ये बाबाजींचे दर्शन लाभले, हा अलौकिक योग आहे,’ असे शिंदे यांनी या वेळी सांगितले. ‘मला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले; पण हा सन्मान विशेष आहे. कारण तो जनतेच्या प्रेमाचा आणि संत परंपरेच्या आशीर्वादाचा आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची आणि पंजाब गुरू गोविंदसिंहजींची भूमी आहे. ही संतांची, शूरांची भूमी आहे. वारकरी आणि धारकरी या महाराष्ट्र आणि पंजाबच्या समान परंपरा आहेत. संत नामदेवांना पंजाबमध्ये सर्वोच्च स्थान आहे. त्यांनी या संबंधांची पायाभरणी केली, तर राजगुरू आणि भगतसिंह, करतारसिंग सराबा आणि विष्णू गणेश पिंगळे, लाल-बाल-पाल यांनी या संबंधांना बळकटी दिली,’ असेही त्यांनी या वेळी सांगितले.
...
शीख बांधवांसाठी माझे घर सदैव खुले!
बाळासाहेब ठाकरे यांनी १९८४मध्ये शीख बांधवांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले. आजही आम्ही तोच बंध जपत आहोत, असे सांगून कुठलीही अडचण आली, तर शीख बांधवांसाठी माझे घर सदैव खुले आहे. मी कार्यकर्ता असो वा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री सेवा हेच माझे कर्तव्य आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.