संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्मे विस्मृतीत
सरकारकडे माहितीच नाही
‘हुतात्मा स्मृतिदिन’ विशेष
मयूर फडके ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० ः संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी २१ नोव्हेंबर १९५६मध्ये १०६ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. २१ नोव्हेंबरला ‘हुतात्मा स्मृतिदिन’ म्हणून त्यांच्या या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते; परंतु ७० वर्षे उलटून गेल्यावरही शासनदरबारी या १०६ शहिदांची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे केवळ महाराष्ट्र दिन, हुतात्मा दिवसापुरतीच त्यांची आठवण मर्यादित राहिल्याची खंत व्यक्त होत आहे.
संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले; मात्र आजतागायत त्यांच्या संदर्भातील कुठलीही माहिती शासनदरबारी किंवा गुगल, विकिपीडियावर लेखी स्वरूपात नमूद नाही. ज्यांच्यामुळे संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला, त्यांची ओळख नव्या पिढीला व्हावी, यासाठी ७० वर्षांत राज्य सरकारकडून कुठलीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे हे हुतात्मे विस्मृतीत गेले आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन शिगेला पोहोचले होते. २१ नोव्हेंबर १९५६मध्ये तत्कालीन सरकारने दिसताक्षणी गोळी झाडण्याचे आदेश दिले. पोलिस गोळीबारात २५ वर्षीय भास्कर कामतेकर यानी आपला जीव गमावला. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांना सरकारकडून मदत मिळाली, पुतण्याला पालिकेत नोकरी मिळाली; परंतु बलिदान देणाऱ्या भास्कर यांची ओळख मात्र काळाच्या ओघात विस्मृतीत गेली. त्यांचे पुतणे आजही दादरला वास्तव्यास आहेत. एका रस्त्याला भास्कर कामतेकरांचे नाव देण्यासाठी त्यांना पालिका, राजकीय नेत्यांकडे पायपीट करावी लागली. तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांनतर दादर परिसरातील एका छोट्याशा गल्लीला कामतेकरांचे नाव देण्यात आले. जे काम सरकारकडून होणे अपेक्षित होते, त्यासाठी आम्हाला खूप खस्ता खाव्या लागल्याची खंत हुतात्मा कामतेकरांच्या कुटुंबीयांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली. कोणालाही त्यांच्या बलिदानाची माहितीच नाही. ती जगासमोर यावी म्हणून गेल्या सहा दशकांत सरकारकडून काहीच पावले उचलली नसल्याची खंतही कामतेकर कुटुंबीयांनी बोलून दाखवली.
...
नावांचा विसर...
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनादरम्यान गिरगाव चौपाटीवर झालेल्या गोळीबारात शहीद झालेले १०६वे हुतात्मे सीताराम घाडीगावकर हे स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ पत्रकार दत्ता घाडीगावकरांचे धाकटे बंधू होते. हुतात्मा स्मारक उभारताना त्या भिंतीवरील फलकावर बरेच वर्षे १०६ हुतात्म्यांची नावे नमूद नव्हती; परंतु माझ्या वडिलांच्या संग्रही त्या १०६ हुतात्म्यांची नोंद होती. सरकारकडे त्याची नोंद नव्हती. मुंबईचे तत्कालीन महापौर छगन भुजबळ यांच्याकडे वडिलांनी वर्षभर या गोष्टींचा पाठपुरावा करून तेथील शिल्पावर हौतात्म्य स्वीकारलेल्यांच्या नावांची यादी झळकवल्याचे दत्ता घाडीगावकर यांचे पुत्र हेमंत घाडीगावकर यांनी सांगितले. हुतात्म्यांप्रति ही एक प्रकारची अनास्था असल्याचेही ते म्हणाले.
...
पाठ्यपुस्तकात धडे केव्हा?
येणाऱ्या पिढीला संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास कळला पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने पाठ्यपुस्तकात संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर धडा समाविष्ट करावा, अशी मागणी या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रेसर असलेल्या ज्येष्ठ लोकशाहीर दिवंगत आत्माराम पाटील यांच्या पत्नी इंद्रायणी पाटील यांची आहे. गेली अनेक वर्षे त्या ही मागणी करीत आहेत; मात्र सरकार काहीच हालचाली करीत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
...
संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या १०६ हुतात्म्यांची कुठेच माहिती उपलब्ध नसणे, ही एक शोकांतिका म्हणावी लागेल. या लढ्याविषयी लघुपट, माहितीपट आले पाहिजेत. महाराष्ट्राचा हा समग्र इतिहास समोर आलाच पाहिजे.
- ज्ञानेश महाराव, पत्रकार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.