त्रिभाषेविषयी २० डिसेंबरपर्यंत अहवाल देणार
समितीचे अध्यक्ष डॉ. जाधव यांची माहिती
मुंबई, ता. २८ ः राज्यातील शाळांत पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या डॉ. नरेंद्र जाधव समितीची मुंबईतील बैठक पार पडली. ही राज्यातील अखेरची बैठक होती. त्यानंतर समितीचा हा अहवाल मुदतीपूर्वीच २० डिसेंबरपर्यंत सरकारला सादर केला जाणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. जाधव यांनी मुंबईत दिली. अहवाल सादर करण्याची ५ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आहे.
राज्यभरातून १० हजार लोकांनी प्रश्नावली भरून दिली असून एक हजार २०० लोकांची मतावली आली आहे. त्यांचे विश्लेषण करून अहवाल तयार केला जाणार आहे, असेही डॉ. जाधव म्हणाले. मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या या बैठकीदरम्यान उपस्थितांपैकी ९५ टक्के नागरिक, शिक्षक आदींनी पहिलीपासून हिंदी विषय लागू करण्याला ठाम विरोध दर्शवला तर अनेकांनी हा विषय तिसरीपासून तर काहींनी सहावीपासून लागू करण्याची मागणी केली. काही अधिक भाषा शिकल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानकक्षा रुंदावतात, यामुळे हिंदीला विरोध होऊ नये, त्यापेक्षा इतर काही पर्याय द्यावेत, अशाही मागण्या केल्या.
मुंबईत झालेल्या बैठकीत समितीचे सदस्य सचिव संजयराव यादव, सदस्य डॉ. अपर्णा मॉरिस, डॉ. सोनल कुलकर्णी-जोशी, शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ, शिक्षण निरीक्षक वैशाली वीर, मुस्ताक शेख यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक, विविध शाळांतील विद्यार्थी उपस्थित होते.
पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याची माझी शिफारस नाही, असे जाधव यांनी स्पष्ट केले. समितीने राज्यातील आठ शहरांत खुली केली. यामध्ये पहिलीपासून हिंदीला ९५ टक्के लोकांनी विरोध केला. या आधारावर आम्ही तयार केलेला अहवाल पुढील २० वर्षांहून अधिक काळ विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारा ठरेल. या अहवालात शाळांचे विविध प्रश्न, गुणवत्ता याविषयी समस्या स्पष्टपणे मांडणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
बैठकीच्या सुरुवातीला शिक्षण विकास मंचचे समन्वयक डॉ. माधव सूर्यवंशी यांनी पहिली ते पाचवीपर्यंत तिसरी भाषा सुरू करू नये. यामुळे विद्यार्थ्यांवर ताण येईल, अशी भूमिका मांडली. शालेय शिक्षणात आमूलाग्र बदल घडविणाऱ्या १६ सूचनांचे निवेदनही त्यांनी दिले. शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे यांनी आपले सर्व प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून असावे, यावर भर दिला. असंख्य विषयांना आज शिक्षक नाहीत. दरम्यान, मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे यांनी पाचवीपासून हिंदीसोबत इतर भाषांचाही पर्याय असावा. त्यासाठी गुण न देता श्रेणी दिली जावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
--
पहिलीपासून हिंदी हवीच
हंसराज पब्लिक स्कूलच्या शिक्षिका उमा ढेरे यांनी लहानपणी त्यांची आकलन क्षमता खूप असते. यामुळे त्रिभाषा सूत्र पहिलीपासून लागू केल्यास विद्यार्थ्यांना अनेक भाषा शिकता येतील, असे मत व्यक्त केले. पहिलीपासून हिंदीचा विषय असावा, याला नरसी मोनजी शाळेच्या शिक्षिका ममता झा यांनीही लावून धरली. शिक्षक जयंत गायकवाड यांनी व्यवहाराची भाषा असल्याने ती पहिलीपासून शिकवली तर मुले प्रगतशील होतील, असे मत व्यक्त केले.
--
विद्यार्थ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
बालमोहन विद्यामंदिरातील आर्या भगत हिने मराठी बारावीपर्यंत करून संस्कृत शिकवण्यावर भर दिला. रुही बांदेकर हिने अभ्यासासोबत कलेची आवड असावी, असे मत व्यक्त केले, तर श्रेया जोंधळे या शालेय विद्यार्थिनीने पहिलीपासून हिंदी नको म्हटले. सेंट कोलंबा स्कूलच्या तीर्था पिळणकर या विद्यार्थिनीने तर सगळ्यांसाठी तिन्ही भाषा बंधनकारक असाव्यात, यामुळे भाषिक अडचण येणार नसल्याने स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.