नववर्ष स्वागतासाठी मुंबईत कडेकोट बंदोबस्त
मुंबई, ता. ३० : नववर्ष स्वागताच्या जल्लोषाला कोणत्याही अनुचित घटना, घातपात, महिलाविरोधी गुन्ह्यांचे गालबोट लागू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
यंदा पालिका निवडणुकीच्या धामधुमीत नववर्षाचे स्वागत होईल. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून दरवर्षी सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल, मॉल आदी ठिकाणी आयोजित होणाऱ्या कार्यक्रम, पार्ट्यांमध्ये भर पडणार आहे. ही बाब लक्षात घेत विशेष खबरदारी घेतल्याचा दावा पोलिस दलातर्फे मंगळवारी (ता. ३०) करण्यात आला. नागरिकांना सुरक्षित व निर्विघ्नपणे नववर्षाचे स्वागत करता यावे, यासाठी मुंबई पोलिस दलातील १० अतिरिक्त आयुक्त, ३८ उपआयुक्त, ६१ सहाय्यक आयुक्तांसह २,७९० पोलिस अधिकारी आणि १४,२०० पोलिस अंमलदार असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यासोबत मोक्याच्या ठिकाणी राज्य राखीव पोलिस बल, शीघ्र कृती दल, दंगलविरोधी पथक आदी विशेष तुकड्या तैनात केल्या जातील, असे सांगण्यात आले.