नाराजी टाळण्यासाठी युतीची घोषणा रात्री
मित्रपक्षांबाबत भाजपची रणनीती
मुंबई, ता. ३० : यशाची खात्री असूनही मित्रपक्षांची नाराजी टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाने वाटाघाटी लांबवून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या आदल्या रात्री उशिरा युतीची घोषणा केली.
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला यशाची खात्री असली तरी मित्रपक्षांमध्ये बंडखोरी झाल्यास तसेच ठाकरे-मनसे युतीनंतर त्यांची काँग्रेससोबत छुपी युती झाल्यास फटका बसण्याच्या शक्यतेबाबत भाजप नेत्यांना जाणीव आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि रिपब्लिकन पक्षांतील नाराज मातब्बर उमेदवारांनी बंडखोरी करू नये, याची काळजी घेण्यासाठी भाजपने शेवटच्या दिवसापर्यंत वाटाघाटी लांबवल्या. त्याचबरोबर मित्रपक्षांच्या उमेदवारांनी बंडखोरी करू नये किंवा विरोधी पक्षांमध्ये जाऊ नये, यासाठी युतीची घोषणा टाळून त्यांना शेवटपर्यंत प्रतीक्षेत ठेवण्यात आल्याचे जाणकारांनी सांगितले.
भाजपला काही प्रमाणात ठाकरे-मनसे युतीची आणि ठाकरे-काँग्रेस यांच्या छुप्या युतीची धास्ती आहे. त्यामुळे कोणताही धोका न पत्करण्याचे त्यांचे सूत्र आहे. विधानसभेत ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी मनसे आणि काँग्रेसच्या साथीने त्यांना संजीवनी मिळू नये, यादृष्टीने भाजपने खबरदारीची भूमिका घेतली. शिवाय लोकसभा निकालांची राज्यात पुनरावृत्ती होऊ नये, यासाठीही भाजप डोळ्यात तेल घालून दक्ष आहे, असे सूत्रांनी सांगितले.
---
शिंदे गटाला खूश करण्याचा प्रयत्न
राजकीय डावपेचांनुसार भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जागावाटप चर्चेचे गुऱ्हाळ शेवटपर्यंत सुरू ठेवले. शिंदे यांनी आधी १२५ जागांची मागणी केली होती; मात्र त्यांना ९० जागांपर्यंत खाली आणले गेले. शिंदे गटातील बड्या नेत्यांच्या मुला-मुलींना उमेदवारी देऊन त्यांनाही खूश करण्यात आले.