कर्करोगाला लक्ष्य
नव्या वर्षात पालिकेच्या ‘कॅन्सर सारथी’ उपक्रमाचा विस्तार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : कर्करोगामुळे होणारा मृत्युदर कमी करणे, अधिकाधिक रुग्णांपर्यंत वेळेत उपचार पोहोचवणे आणि लवकर निदानाची साखळी अधिक मजबूत करणे, या उद्देशाने २०२६मध्ये महापालिकेची कर्करोग प्रतिबंध मोहीम आणखी व्यापक स्वरूपात राबवली जाणार आहे. २०२५मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘कॅन्सर सारथी’ उपक्रमाचा विस्तार करीत स्क्रीनिंग, जनजागृती, रेफरल आणि उपचार समन्वय या सर्व टप्प्यांवर अधिक भर देण्यात येणार आहे.
फेब्रुवारी २०२५ पासून ३० वर्षांवरील नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग या तीन सामान्य कर्करोगांच्या तपासणीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आरोग्य केंद्र आणि दवाखान्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे तीन लाख १० हजार नागरिकांचे स्क्रीनिंग करण्यात आले असून, सुमारे पाच हजार संशयित रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांना पुढील तपासणी, बायोप्सी आणि उपचारांसाठी संदर्भित करण्यात आले असून, सुमारे ८०० रुग्णांची बायोप्सी पूर्ण झाली आहे.
मोहिमेचा महत्त्वाचा भाग म्हणजे रुग्णांचे ‘हँड होल्डिंग.’ संशयित किंवा निदान झालेल्या रुग्णांना योग्य रुग्णालयात पोहोचवणे, पुढील तपासण्या व उपचारांसाठी मार्गदर्शन करणे आणि सातत्याने पाठपुरावा करणे हे या उपक्रमात समाविष्ट आहे. टाटा रुग्णालयाच्या समन्वयाने सुमारे तीन हजार आशासेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, त्या घरोघरी जाऊन कर्करोगाबाबत जनजागृती करीत आहेत.
२०२६मध्ये तृतीयस्तरीय रुग्णालये, खासगी आरोग्य संस्था आणि पीएमजेवायसारख्या योजनांशी समन्वय अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. लवकर निदानामुळे उपचार अधिक प्रभावी ठरतात आणि रुग्णांचा जगण्याचा दर वाढतो, हे लक्षात घेऊन कर्करोगासह असंसर्गजन्य आजार, मीठ व साखर कमी वापरण्याबाबतची जनजागृती आणि सुरू असलेल्या आरोग्य उपक्रमांची अधिक काटेकोर अंमलबजावणी करण्याचा महापालिकेचा मानस आहे.
आशा वर्कर्सची मदत
पालिकेने आशा वर्कर्सना प्रशिक्षण दिले असून, त्या घरोघरी जाऊन जागरूकतेचे काम करीत आहेत. तसेच त्या डोअर टू डोअर रुग्ण ओळख करीत आहेत. प्रत्येक शनिवारी-रविवारी पालिकेच्या मॅटर्निटीमध्ये संशयित रुग्णांना आणून स्त्रीरोगतज्ज्ञांकडून तपासण्या केल्या जात आहेत. यात ३० वर्षांवरील महिलांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
२०२५मधील आरोग्य उपक्रम
- कॅन्सर केअरमध्ये बळकटी आणि लक्ष केंद्रित केले आहे.
- असंसर्गिक आजार प्रतिबंधासाठी मीठ-साखर तपासणी शिबिर आयोजित केले.
- बीपाल-एम उपचार सुरू आहे.
- १,००० हून अधिक एमडीआर टीबी रुग्णांना लाभ मिळत आहे.
- सुरक्षित माता आणि बाळासाठी हाय रिस्क गरोदर महिलांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.