टॅक्सीचालकांच्या जादा भाड्याला लगाम लागेना
विमानतळ, रेल्वे स्थानकावर प्रवाशांची लूट सुरूच
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीचालकांकडून प्रवाशांची फसवणूक सुरूच आहे. सीएसएमटी, दादर, कुर्ला, बांद्रा, अंधेरी रेल्वे स्थानकांसह विमानतळ परिसरात जादा भाडे आकारणे, मीटरने भाडे नाकारणे, जादा प्रवासी घेणे, जलद मीटर आणि उद्धट वर्तन यामुळे प्रवाशांना मनस्ताप होत आहे.
वाहतूक विभागाकडून होत असलेल्या कारवाईचा परिणाम दिसत नाही. परवाना निलंबन, अनुज्ञप्ती रद्द आणि दंड आकारणी अशा कारवाया केल्या जातात, पण चालकांची मनमानी सुरूच आहे. सीएसएमटी ते गोल देऊळसारख्या जवळच्या ठिकाणी मीटरऐवजी २०० ते २५० रुपये मागितले जातात. दादर रेल्वे स्थानकाबाहेर भाडे नाकारणे आणि एक किलोमीटरसाठी ७० रुपये आकारणे हे नेहमीचेच आहे.
कुर्ला पूर्व ते वाशी नाका अंतर मीटर ८० रुपयांचे असतानाही रिक्षाचालक १५० ते २०० रुपये मागतात. एका प्रवाशाने सांगितले, की मीटरने जाण्यास नकार देत अव्वाच्या सव्वा भाडे मागितले जाते. अंधेरी स्थानक ते एमआयडीसीसाठी मीटर ५० रुपये दाखवतानाही २०० रुपये मागितले जातात. तसेच इतर रिक्षांना थांबू दिले जात नाही, असा आरोप समीर हवाले यांनी केला. वांद्रे रेल्वे स्थानक ते बीकेसीसाठी १५ रुपये घेणे अपेक्षित असताना ३० ते ६० रुपये घेतले जातात. अरुण गमरे म्हणाले, की प्रत्येक प्रवाशाकडून अतिरिक्त पैसे वसूल केले जातात. विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवरही ही लूट सुरू आहे.
कोणत्या अडचणींचा करावा लागतो सामना?
मुंबई महानगरात या वाहनांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोज अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामध्ये प्रवाशांना भाडे नाकारणे, उद्धट वर्तन, गैरवर्तन, अधिकचे भाडे आकारणे, सार्वजनिक वाहनात प्रवाशांकडून वस्तू विसरल्यास त्या परत न करणे, प्रवाशांना लांबच्या रस्त्याने इच्छित स्थळी पोहोचवणे, वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवासी बसविणे, नादुरुस्त वाहन रस्त्यावर चालविणे या प्रमुख अडचणींचा समावेश आहे.
काय होते कारवाई?
रिक्षा, टॅक्सीची तपासणी करून जादा भाडे, जादा प्रवासी, जलद मीटर, भाडे नाकारणे, उद्धट वर्तन याप्रकरणी कारवाई केली जाते. यामध्ये परवाना निलंबन, अनुज्ञप्ती निलंबन यासह दंड आकारला जातो.
कुठे करणार संपर्क?
रिक्षा, टॅक्सी तसेच ॲपआधारित ओला, उबेर अशा वाहनांच्या चालकांविरुद्धच्या तक्रारींचे प्रवाशांना निरसन करता यावे, बेशिस्त चालकाविरुद्ध कारवाई करता यावी, यासाठी संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी प्रवासी मदत कक्ष, टोल फ्री क्रमांक १८००-२२०-११० हा सुरू करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.