कूपर रुग्णालयात भटक्या कुत्र्यांचा मुक्त संचार
रुग्ण, लहान मुलांना चावल्याच्या घटना; महापालिकेकडे तातडीच्या कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबई महापालिकेच्या पार्ले येथील कूपर रुग्णालयाच्या आवारात तब्बल ४० हून अधिक भटक्या कुत्र्यांचा मुक्त संचार सुरू असून, रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज सुमारे दोन हजार बाह्यरुग्णांची वर्दळ असलेल्या या महत्त्वाच्या महापालिका रुग्णालयातच रुग्णांना उपचाराऐवजी सुरक्षेची चिंता भेडसावत असल्याचे चित्र आहे.
भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर रुग्ण व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण करत असल्याची गंभीर दखल घेत अधिष्ठाता डॉ. देव शेट्टी यांनी संबंधित यंत्रणेकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. रुग्णालय परिसरातून सुमारे ३५ ते ४५ भटके कुत्रे आणि त्यांची पिल्ले सुरक्षितपणे हटवून पुनर्वसन करावे, अशी मागणी केली आहे.
रुग्णालयाच्या इमारतीत, कॉरिडॉरमध्ये तसेच आवारात कुत्र्यांची व पिल्लांची वस्ती वाढली आहे. अलीकडे काही रुग्ण व लहान मुलांना चावा घेतल्याच्या घटनाही घडल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. संसर्ग नियंत्रणाच्या दृष्टीनेही ही परिस्थिती धोकादायक ठरत असल्याचे सांगितले जात आहे.
रुग्णालयीन स्वच्छता आणि रुग्णालय संसर्ग नियंत्रण नियमांवर यामुळे परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अधिष्ठाता डॉ. देव शेट्टी यांनी संबंधित महापालिका यंत्रणेला पत्र पाठवून तातडीने कारवाईची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रुग्णालय परिसरातील भटके कुत्रे हटवून त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करून निर्दिष्ट निवाऱ्यात स्थलांतर करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
या कुत्र्यांना आवारात येऊन अन्नपदार्थ दिले जातात. काही जण खास कुत्र्यांसाठी तर दूध-बिस्कीट घालतात. सहज अन्न मिळत असल्याने कुत्र्यांची संख्या वाढत असून, त्यांचा त्रास मात्र रुग्णांना होत असल्याचे तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे या गंभीर प्रश्नावर महापालिका प्रशासन नेमकी कोणती पावले उचलते, याकडे रुग्ण व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
रुग्णालयाचे म्हणणे काय?
कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. देव शेट्टी म्हणाले, रुग्णालय हे रुग्णांसाठी सुरक्षित आश्रयस्थान असले पाहिजे. मात्र, सध्या ४० पेक्षा अधिक भटक्या कुत्र्यांचा मुक्त वावर रुग्णांच्या सुरक्षेला थेट धोका निर्माण करीत आहे. ज्येष्ठ नागरिक आणि बालरुग्णांसाठी ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. महापालिकेने तातडीने हस्तक्षेप करून रुग्णालय परिसर भटक्या कुत्र्यांपासून मुक्त करावा, अशी मागणी त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.