लाड-पागे समितीची प्रकरणे सहा महिन्यांत निकाली काढा ः मंत्री डॉ. उदय सामंत
मुंबई, ता. १६ : सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या नोकरीसंदर्भातील लाड-पागे समितीची प्रलंबित प्रकरणे सहा महिन्यांच्या आत निकाली काढावीत, असे निर्देश मुंबई महापालिकेला देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. तसेच राज्यातील सफाई कामगारांच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी तसेच लाड-पागे समितीच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. याबाबत सदस्य उमा खापरे यांनी प्रश्न उपस्थित केला, तर सदस्य निरंजन डावखरे, सचिन अहिर, सदाभाऊ खोत, भाई जगताप यांनी उपप्रश्न उपस्थित केला.
मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत लाड-पागे समितीच्या शिफारसीनुसार अनेक ठिकाणी भरती करण्यात आली आहे. लाड-पागे समितीनुसार वारसा हक्काने नोकरी देताना संबंधित उमेदवाराचे शैक्षणिक पात्रता लक्षात घेऊन नियुक्ती देण्याबाबत शासनाने जीआर काढला आहे. मात्र, अनेकदा उमेदवार उच्च शिक्षित असल्याने त्यांना त्याच पदावर नियुक्ती देताना अडचणी निर्माण होतात. तसेच नवीन नियुक्त्या देताना महापालिकांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने काही प्रशासकीय अडथळे निर्माण होत आहेत.
मुंबई महापालिकेमध्ये सफाई कामगारांसाठी सेवा निवासस्थानांच्या बाबतीत आतापर्यंत ५,५९२ घरांचे वाटप करण्यात आले असून, पुनर्विकासानंतर १२,२५४ सेवा निवासस्थान उपलब्ध होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सफाई कामगारांच्या अपघाती मृत्यूच्या प्रकरणात देण्यात येणारी नुकसानभरपाई १० लाखांवरून ३० लाखांपर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. लाड-पागे समिती अंतर्गत वारसा हक्काच्या १,९४४ प्रकरणांपैकी ४३६ जणांना नियुक्ती देण्यात आली असून, काही प्रकरणे कागदपत्रांच्या अभावामुळे किंवा संबंधितांनी नियुक्ती स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे प्रलंबित असल्याचे मंत्री डॉ. उदय सामंत यांनी या वेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.