विद्यार्थ्यांना मिळणार नवोपक्रम आणि स्टार्टअपसाठी बळ
रत्नागिरी उपपरिसरात ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर’ला मंजुरी
मुंबई, ता. २१ : मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसराची निवड भारत सरकारच्या नीती आयोगांतर्गत कार्यरत अटल इनोव्हेशन मिशन यांच्या ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर’ योजनेसाठी करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी २.५ कोटी रुपयांचे अनुदान नुकतेच मंजूर झाले आहे. ग्रामीण व निमशहरी भागात नवोपक्रम आणि स्टार्टअप संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या योजनेमुळे कोकणातील युवक, शेतकरी, मत्स्यव्यावसायिक आणि स्थानिक उद्योजकांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. मोठ्या शहरांपुरती मर्यादित असलेली स्टार्टअप परिसंस्था आता गावपातळीवर पोहोचविण्याचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून कोकण पट्ट्याला स्वयंपूर्ण उद्योजक केंद्र म्हणून विकसित करण्याचा मुंबई विद्यापीठाचा मानस आहे. स्थानिक पातळीवरील समस्या जसे फळप्रक्रिया कचरा, सागरी वाहतूक यांचे रूपांतर व्यावसायिक संधींमध्ये करण्यावर भर दिला जाणार आहे. यामुळे ‘आत्मनिर्भर कोकण’ साकारण्यास चालना मिळेल. रत्नागिरी उपपरिसरात सुमारे ४,००० चौरस फूट जागेत अत्याधुनिक ‘फॅब लॅब’सह इन्क्युबेशन सुविधा उभारण्यात येणार आहेत. स्टार्टअप्ससाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन, प्रोटोटायपिंग, तसेच निधी उपलब्ध करून देण्यासाठी एकात्मिक परिसंस्था निर्माण केली जाणार आहे. मुंबईतील तज्ज्ञ व उद्योग क्षेत्राशी थेट जोडणीही साधली जाणार आहे.
प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार
१८० किमीपेक्षा अधिक किनारपट्टी असलेला रत्नागिरी जिल्हा ‘ब्ल्यू इकॉनॉमी’साठी मोठी क्षमता बाळगत असून, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उद्योजकतेकडे वळविण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. टियर-३ शहरात हा उपक्रम राबविणे म्हणजे शहरी-ग्रामीण नवोपक्रम दरी कमी करण्याच्या केंद्र सरकारच्या उद्दिष्टाला चालना देणारे पाऊल ठरणार आहे. हा प्रकल्प केवळ विद्यार्थ्यांसाठी मर्यादित नसून समाजातील विविध घटकांना लाभ देणारा आहे. शेतकऱ्यांसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, महिला बचत गटांसाठी ब्रँडिंग व मार्केटिंग सहाय्य, तसेच युवकांसाठी थ्री-डी प्रिंटर, लेझर कटर, सीएनसी यंत्रसामग्रीसारख्या अत्याधुनिक साधनांचा वापर उपलब्ध होणार आहे.
--
“मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसरातील हा उपक्रम कोकणातील नवोपक्रम, कौशल्यविकास आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरेल. ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर’ हे कोकणातील युवकांसाठी स्वप्नांना उभारी देणारे व्यासपीठ ठरणार असून पुढील पाच वर्षांत ६० पेक्षा अधिक स्टार्टअप्सना चालना देऊन हजारो रोजगारनिर्मितीचे लक्ष बाळगून कोकणाच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी हे पाऊल टाकण्यात आले आहे. स्थानिक कौशल्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत ‘आत्मनिर्भर कोकण’ घडविण्यास हा उपक्रम सहाय्यभूत ठरेल.”
- प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.